ना. रवींद्र चव्हाणांची मोठी घोषणा ; सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सा. बां. विभागाचे स्वतंत्र मंडळ निर्माण होणार !
जिल्ह्यातील विविध विकासात्मक प्रकल्प, विकास कामाना मिळणार गती ; ना. चव्हाण यांच्या निर्णयाचे होतेय स्वागत
मालवण | कुणाल मांजरेकर
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्गात मोठी घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्याशी जोडला गेल्याने येथील विकास कामांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सा. बां. विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालय स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी संबोधित करताना ते बोलत होते.
सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यासाठी मिळून एकच मंडळ कार्यालय रत्नागिरी येथे कार्यरत आहे. अधीक्षक अभियंता, रत्नागिरी यांच्या कार्यक्षेत्रात दापोली पासून दोडामार्ग पर्यंत सुमारे ४०० कि.मी. चे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यभार करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय सुरू होणार असल्यामुळे सा. बां. विभागाचे कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी निश्चित मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यासाठी विकास निधी अधिक प्राप्त होऊन विविध प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान पद्धतीने होतील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व सावंतवाडी सा. बां विभागाकडे मिळून सुमारे २ हजार कि मी लांबीचे राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग चालत हे मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. तसेच महत्वाचे व मोठे प्रकल्प जसे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, घोटगे – सोनवडे घाटरस्ता बांधकाम तसेच पर्यटन विषयक अनेक कामे वेगाने होतील अणि मार्गी सुद्धा लागतील. त्याचप्रमाणे बांधकाम विभागाची कामे अधिक गुणवत्तापूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.