अयोध्येतील राममंदिर उदघाटन सोहळा शिवसेना ठाकरे गटही साजरा करणार
मालवणच्या राम मंदिरात १८ जानेवारीला आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत महाआरती, महाप्रसाद ; मोटारसायकल रॅलीचेही आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील अयोध्येच्या राम मंदिराचे निर्माण येत्या २२ जानेवारीला होत आहे. भाजपकडून हा सोहळा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी इव्हेन्ट म्हणून साजरा केला जात असला तरी या राम मंदिरासाठी अनेक शिवसैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. या शिवसैनिकांच्या त्यागाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मालवणात शिवसेना ठाकरे गटाकडून राम मंदिर निर्माण सोहळा साजरा केला जाणार आहे. गुरुवारी १८ जानेवारीला राम मंदिराच्या उदघाटन सोहळ्याच्या औचित्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील राम मंदिरात महाआरती, महाप्रसादासह मोटारसायकल रॅली काढली जाणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व शहरप्रमुख बाबी जोगी यांनी दिली आहे.
१८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता शिवसेना शाखा ते बाजारपेठ फोवकांडा पिंपळ मार्गे भरड नाका मार्गे राम मंदिर पर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार असून दुपारी २ वाजता राम मंदिरात महाआरती आणि महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, १७ ते २० जानेवारी या कालावधीत रामायण या विषयावर चित्रकला स्पर्धा होणार असून विविध वयोगटातील स्पर्धकांन आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.