मालवणच्या व्यापारी एकता मेळाव्यातून व्यापाऱ्यांच्या एकजुटीचे आणि ताकदीचे दर्शन घडवूया 

मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांचे आवाहन ; व्यापारी मेळावा केवळ मौजमजेसाठी नाही

२९ जानेवारीला सागरी महामार्गा पासून व्यापाऱ्यांची स्वागत रॅली ; निलेश राणे यांच्या माध्यमातून “चला हवा येऊ द्या” सांस्कृतिक कार्यक्रम 

३० जानेवारीला तरुण व्यापारी व उद्योजकांसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रम तर

३१ जानेवारीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांसह पालकमंत्री, आमदार, खासदारांच्या उपस्थितीत व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण 

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणात होणारा जिल्हा व्यापारी एकता मेळावा हा केवळ मौज मजेसाठी नसून या मेळाव्यातून प्रबोधन, व्यापार उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन, तरुण व्यापाऱ्यांना प्रोत्साहन अशी अनेक उद्दिष्टे साध्य करण्यात येणार आहे. प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या घरचा कार्यक्रम समजून या मेळाव्यात सहभागी व्हावे, प्रत्येकाने आपला हातभार लावून हा मेळावा यशस्वी करून व्यापाऱ्यांच्या एकजुटीचे व ताकदीचे दर्शन घडवावे, असे आवाहन मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी मालवण व्यापारी संघाच्या बैठकीत केले.

मालवण व्यापारी संघाचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष असून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा यावर्षीचा व्यापारी एकता मेळावा देखील मालवणात बोर्डिंग मैदानावर ३१ जानेवारी रोजी होत आहे. यजमान असलेल्या मालवण व्यापारी संघातर्फे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी चोख नियोजन करण्यात येत असून त्यां दृष्टीने मालवण व्यापारी संघाची बैठक मालवण येथील लिलांजली सभागृहात शुक्रवारी संपन्न झाली. मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा व्यापारी संघांचे कार्यवाह नितीन वाळके, माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, मालवण तालुका व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर, रवी तळाशीलकर, हर्षल बांदेकर, विजय केनवडेकर,  अभय कदम, महेश अंधारी, सरदार ताजर, दिपक पाटकर, सुशांत तायशेटे, अभि परब, सौगंधराज बादेकर, पूनम चव्हाण, प्रभाकर देऊलकर, सुमित कवटकर, राजू सावंत, करण खडपे, गणेश प्रभुलकर, भाऊ सापळे, बाळू तारी, सुहास ओरसकर, पूजा वाडकर, रिया बांदेकर, वैशाली शंकरदास, स्वप्नाली नेरुरकर, नीलिमा आरोलकर, संजीवनी कुडाळकर, प्रसाद धारगळकर, आनंद पारकर, बाबाजी बांदेकर, पंकज पेडणेकर, हेमंत शिरपूटे, दिनेश मुंबरकर, हेमंत शिरगावकर, अमरजीत वनकुद्रे, वेदिका केनवडेकर, राधिका मोंडकर, परशुराम पाटकर, अरविंद सराफ, दशरथ कवटकर, दिलीप बिरमोळे प्रफुल्ल देसाई व इतर उपस्थित होते.

यावेळी विजय केनवडेकर यांनी व्यापारी मेळाव्याच्या रूपरेषेबद्दल माहिती दिली. दि. २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सागरी महामार्ग ते बोर्डिंग ग्राउंड अशी व्यापाऱ्यांची स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यानंतर बोर्डिंग ग्राउंड येथील विविध स्टॉलचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर साडे सात वाजल्यापासून माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चला हवा येऊ द्या हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. तर ३० रोजी सायंकाळी ६ वाजता तरुण व्यापारी व उद्योजकांसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्र होणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सदर होणार आहेत. २९ व ३० रोजीचे कार्यक्रम व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही खुले असणार आहेत. ३१ रोजी मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह पालकमंत्री, खासदार, आमदार यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुरस्कार वितरण, ज्येष्ठ व्यापारी सत्कार व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती विजय केनवडेकर यांनी दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना नितीन वाळके यांनी मेळाव्यात व्यापाऱ्यांचा सहभाग, जबाबदारी व घ्यावायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. व्यापारी मेळावा सुरळीत पार पाडण्यासाठी सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंदणी केली जात आहे. मेळाव्यात व्यापाऱ्यांसाठी प्रबोधनावर जोर देण्यात येणार आहे, असे सांगत सर्व व्यापाऱ्यांनी मिळून हा मेळावा यशस्वी करावा असे नितीन वाळके यांनी सांगितले. यावेळी मेळावा आयोजन व नियोजनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!