माझ्या माहितीप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय, नाहीतर कोणीतरी म्हणेल “तो पण मीच बांधलाय”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टोला ; विनायक राऊत जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, त्यांचा मला अभिमान
कुणाल मांजरेकर
चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात राजकीय नेत्यांची जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सर्वप्रथम आपल्या भाषणात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना टार्गेट केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात राणेंचा पुरेपूर हिशोब केला. माझ्या माहितीप्रमाणे सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर उद्या कोणीतरी म्हणेल तो पण मीच बांधलाय, असं सांगून राणेंनी आरोप केलेले खासदार विनायक राऊत हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी असून त्यांचा मला अभिमान असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवातच टोलेबाजीने केली. आजचा दिवस आदळाआपट करण्याचा नाही, आनंद व्यक्त करण्याचा आहे. कोकणात आंब्याची झाडं अधिक आहेत, तशी बाभळीची झाडंही आहेत, असं सांगून शिवसेना आणि कोकणचं नातं कोणालाही सांगण्याची गरज नाही. आज या विमानतळाच्या माध्यमातून कोकणचं आणि महाराष्ट्राचं वैभव आपण जगासमोर नेत आहोत. देशी विदेशी पर्यटक येथे यावेत यासाठी विविध सुविधांची आवश्यकता आहे, त्यादृष्टीने विमानतळाचे लोकार्पण झाले आहे. आपल्या सिंधुदुर्गचे सौंदर्य गोव्यापेक्षाही सरस आहे. असे असतानाही गोव्याच्या तुलनेत पर्यटक येथे येत नाहीत. हे विमानतळ मार्गी लागल्यानंतर पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतील. हे विमानतळ आपल्याला आंतरराष्ट्रीय बनवायचं आहे, त्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची आवश्यकता लागणार आहे. याठिकाणी विमानतळा सोबतच हेलिकॉप्टर पर्यटन सुरू करून पर्यटकांना हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग सफर घडवल्यास पर्यटनाचं एक वेगळं दालन सुरू होईल, कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. याची सुरुवात आज या विमानतळाच्या माध्यमातून आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
विनायक राऊत निवडून आलेले लोकप्रतिनिधी
चांगल्या कामात काळा टीका लावला जातो, त्याप्रमाणे या कार्यक्रमालाही काळा टीका लावणारी व्यक्तीही याठिकाणी आहे. मात्र कोकणची जनता डोळे मिटून राहणारी नाही, ती मर्द आहे. म्हणूनच विनायक राऊत यांच्या रुपाने आपला हक्काचा लोकप्रतिनिधी त्यांनी निवडून दिला आहे. खासदार विनायक राऊत यांचा मला अभिमान असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. विकास कामात मी कधीही राजकारण करत नाही. म्हणूनच राणेंच्या मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळण्यासाठी फाईल माझ्या टेबलावर आली, तेव्हा लगेच मी त्यावर सही केली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नितीन गडकरीं सोबत सोमवारी बैठक
कोकण रेल्वे एक आव्हान होते याप्रमाणेच विमानतळ देखील आव्हान समजून आम्ही या विमानतळाचे काम पूर्ण केले. आज येथील सर्व रस्त्यांची परिस्थिती बिकट असून यासंदर्भात सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुंबई-गोवा महामार्गाचे रत्नागिरी आणि रायगड मधील उर्वरित काम तातडीने पूर्ण होण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. विकासाच्या कामावेळी कोणताही राजकीय अभिनिवेश आड येता नये. तलवार चालवण्याची वेळच आलीच तर ती शत्रु विरोधात चालवायची असते. आपापसात तलवार चालवून फायदा होत नाही. नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु का असेना केंद्रात महत्त्वाचे खाते मिळाले आहे. या खात्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न झाल्यास ते जनतेसाठी लाभदायक असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.