विनयभंग प्रकरणी मालवणात उबाठा गटाच्या युवासेना माजी शहरप्रमुखासह ५ जणांवर गुन्हा दाखल
महिलेसोबत अश्लील वर्तन करीत तसेच अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
मालवण : किराणा सामानाच्या जुन्या बिलाच्या वसुलीच्या वादातून ३८ वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केल्याप्रकरणी उबाठा गटाच्या मालवण युवासेना शहरप्रमुखासह पाच जणांवर मालवण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना सोमवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता सदरील महिलेच्या घरानजिक घडली. आरोपींमध्ये उबाठा गटाचा युवासेना माजी शहरप्रमुख तपस्वी तुळशीदास मयेकर (रा. वायरी गर्देरोड) याच्यासह अंकित शरद गावकर, शैलेश शरद गावकर, प्रथमेश चव्हाण, रत्नदीपक चव्हाण ( सर्व रा. वायरी भरडवाडी) यांचा समावेश आहे. राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या घटनेमुळे मालवणात खळबळ उडाली आहे.
सदरील महिला आपले दोन मुलगे आणि मानलेल्या भावासह राहते. तीने मागील वर्षी आंगणेवाडी यात्रेच्या दरम्यान वायरी भरडेवाडी येथे कमलेश शरद गावकर याच्या किराणा मालाच्या दुकानातून १५ हजार रुपयांचे किराणा सामान उधारीवर घेतले होते. यातील १२ हजार रुपये जत्रा झाल्यावर काही दिवसांनी परत केले. मात्र उर्वरित ३ हजाराची रक्कम शिल्लक राहिली होती. या रक्कमेची मागणी कमलेश वारंवार करीत होता.. मंगळवारी ८ जानेवारीला वरील ५ जणांनी या महिलेच्या घराबाहेर आले आणि त्यांनी महिलेस अश्लील शिवीगाळ सुरु केली. तसेंच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार या महिलेने दिली आहे. त्यानुसार मालवण पोलिसांनी या पाचही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत करीत आहेत.