नागरिकांना सुख समाधानाने जगण्यासाठी पंतप्रधान मोदींची धडपड
जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन मोदींच्या कामाचे प्रबोधन समाजात करावे ; मसुरे देऊळवाडा येथे विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन
आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांवरून अधिकाऱ्यांचे कान टोचले ; अधिकारी वर्गाने पोस्टमन बनून कार्ड वितरीत न करण्याचा सल्ला
मालवण | कुणाल मांजरेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ९ वर्षात वेगवेगळ्या प्रकारच्या ५४ योजना दिल्या आहेत. यामध्ये आयुष्यमान भारत योजनेबरोबरच देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचे काम ते करत आहेत. साडेतीन कोटी लोकांना मोफत घरे त्यांनी बांधून दिली असून वेगवेगळ्या योजना त्यांनी जनतेसाठी आणल्या आहेत. एवढं काम आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने केलेलं नाही. माझा भारतीय नागरिक सुख, समाधान आणि आनंदाने, आत्मनिर्भरतेने जगला पाहिजे, यासाठी पंतप्रधान मोदी काम करत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन मोदींच्या कामाचे प्रबोधन समाजात करावे, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मालवण तालुक्यातील मसुरे देऊळवाडा शाळेत बोलताना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत यात्रा सोमवारी मसुरे येथे दाखल झाली. यावेळी उपस्थिताना संबोधित करताना ना. राणे बोलत होते. यावेळी आयुष्यमान भारत योजनेचे कौतुक करताना ना. राणे यांनी अधिकारी वर्गाला खडेबोल सुनावले. ज्या व्यक्तीला लाभ देणार त्याला त्या योजनेची माहिती हवी. अधिकाऱ्यांनी पोस्टमन बनू नका. आपल्याला कार्ड देऊन पुढे जायच नाही. हे कार्ड कोणी दिले, कशासाठी दिले, त्याचा हेतू काय हे सांगायला पाहिजे, बोललं पाहिजे असं नारायण राणे म्हणाले.
विकसित भारत संकल्प यात्रा मसुरे गावात दाखल झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन झाले. यावेळी विविध योजनेची माहिती देताना लाभार्थी यांना लाभ कार्ड वितरतीत करण्यात आले. तसेच शालेय विध्यार्थी यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी विकासयात्रा झोनल अधिकारी अशोक कदम, नोडल अधिकारी अंकित कुमार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, जि. प. माजी अध्यक्ष सरोज परब, तहसीलदार वर्षा झालटे, गटाविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, सरपंच सुरेखा वायंगणकर, बिळवस सरपंच मानसी पालव, श्री. भोगले, संतोष पालव, भास्कर मांजरेकर यासह भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, छोटू ठाकूर, विजय निकम अन्य लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, लाभार्थी तसेच मुख्याध्यापक प्रवीण पारकर, शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर व अन्य शिक्षक उपस्थित होते.
यावेळी ना. राणे म्हणाले, मोदींनी १४० कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजना आणली आहे. पैशा अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये, म्हणून ही ल योजना असून यात ५ लाखापर्यंत मदत केंद्र सरकार कडून केली जाते. उज्वला गॅस, पाणी, घर तेथे शौचालय योजना यांसारख्या योजना मोदींनी आणल्या असून जो विकास करतो त्याची काळजी घेण्याचे आवाहन ना. राणे यानी केले. नऊ वर्ष मोदी काम करत आहेत. बारा बलुतेदारांना साहित्यासाठी पैसे देण्याचे काम मोदी करीत आहेत. त्यांना आशीर्वाद द्या. आणि मोदींच्या कामाचे प्रबोधन समाजात करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अंकिता मेस्त्री यांनी आयुष्यमान योजना बाबत माहिती दिली. डॉ. वीणा मेहंदळे यांनी आरोग्य विषयक माहिती दिली. तसेच क्षयरोग मुक्त देश करण्यासाठी सर्वांना शपथ दिली. या प्रसंगी आयुष्यमान लाभार्थी रवींद्र परब, मातृवंदना लाभार्थी सिद्धी मसुरकर व अन्य लाभार्थी यांनी विचार मांडत पंतप्रधान मोदी सरकारचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.
देशभर सुरु असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन स्वरूपात सहभागी झाले होते. अनेक राज्यातील लाभार्थी यांच्याशी ते थेट संवाद साधत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित लाभार्थी तसेच विध्यार्थी यांच्या सोबत देऊळवाडा शाळा येथे ऑनलाईन स्वरूपातील हा कार्यक्रमही पहिला. तसेच उपस्थितांशी विविध योजना बाबत संवाद साधला. यावेळी ग्रामस्थ यांनी विविध विकासकामा बाबत मंत्री नारायण राणे यांना निवेदन दिली.