PoliticalNama | विराट… अतिविराट शक्तीप्रदर्शन अन् स्वतः राणेसाहेबांच्या उपस्थितीने दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाची पुन्हा प्रचिती !

दत्ता सामंत यांचा ५५ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा ठरला यादगार… ना. राणेंकडूनही दत्ता सामंत यांच्यावरील प्रेमाची पोचपावती !

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर गेली ३५ वर्षे ध्रुवताऱ्याप्रमाणे चमकणारे व्यक्तिमत्व म्हणजे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य देवदत्त उर्फ दत्ता सामंत ! नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व असे गुण नसनसात ठासून भरलेले दत्ता सामंत हे कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जातात. १९९० मध्ये राणेसाहेबांच्या सानिध्यात आलेल्या काहींनी सर्व पदे उपभोगूनही स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी राणे साहेबांच्या पडत्या काळात त्यांची साथ सोडली. मात्र आजही अनेक कार्यकर्ते कोणतीही अपेक्षा न ठेवता राणे साहेबांसोबत उभे आहेत. त्यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे दत्ता सामंत होय. सक्रिय राजकारणातलं कोणतंही मोठं पद नसलेल्या दत्ता सामंत यांचा ५५ वा वाढदिवस त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमार्फत रविवारी मालवण – कुंभारमाठ येथे साजरा करण्यात आला. या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला जवळपास ६ ते ७ हजाराचा जनसमुदाय लोटला होता. दत्ता सामंत ज्यांना आपला राजकीय गुरू, परमेश्वर मानतात, त्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतःचे पुण्यातील महत्वाचे कार्यक्रम रद्द करून एका सामान्य कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त मालवणात खास उपस्थिती दर्शवून दत्ता सामंत यांच्याशी असलेल्या नात्यावर मोहोर उमटवली. दत्ता सामंत यांच्या बाबत विरोधकांकडून सातत्याने कोणत्या ना कोणत्या अफवा पसरवल्या जातात. अशावेळी राणे साहेबांसारख्या देशाच्या नेत्याने स्वतःचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून उपस्थित राहणे यातून दत्ता सामंत यांच्या टीकाकारांना चोख उत्तर देण्याचं काम केलं आहे. 

घुमडे गावचे शाखाप्रमुख म्हणून राजकारणात आलेल्या दत्ता सामंत यांनी मागील ३५ वर्षाच्या कालावधीत स्वतःच्या नेतृत्वाची झलक दाखवून दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय पटलावर आज प्रतिथयश उद्योजक ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून दत्ता सामंत यांची ओळख आहे. त्यांनी मनात आणले असते तर पं. स. सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष यासारखी मोठी पदे त्यांना सहज मिळवता आली असती. मात्र निवडणुकीच्या आखाड्यातून त्यांनी स्वतःला दूर ठेवत “किंग” पेक्षा “किंगमेकर” बनण्यात अधिक रस दाखवला. २०१९ मध्ये राणे साहेबांच्या आग्रहाखातर त्यांनी कुडाळ मालवण मतदार संघातून आमदारकीचा फॉर्म भरला. मात्र निवडणुकीची कोणतीही तयारी केली नसल्याने समोरील उमेदवाराच्या आक्षेपामुळे त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. मात्र त्यांचा अर्ज दाखल करताना झालेल्या गर्दीची संपूर्ण राज्याने दखल घेतली. त्यानंतरच्या काळातच दत्ता सामंत हे नाव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले.

आज कुडाळ मालवण मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून माजी खासदार निलेश राणे यांच्या नावाची चर्चा आहे. दोन्ही तालूक्यातील भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि जनते मधूनही निलेश राणे यांच्या उमेदवारीची आग्रही मागणी होत असून निलेश राणे यांना येथून निवडून आणत २०१४ मध्ये झालेल्या ना. राणे साहेबांच्या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार येथील भाजपा कार्यकर्त्याकडून करण्यात आला आहे.यामध्ये दत्ता सामंत यांचाही समावेश आहे. त्यामुळे भाजपा मधील ही एकी पाहून विरोधकांच्या गोटातून सातत्याने दांडगा लोकसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ असलेल्या दत्ता सामंत यांच्या विरोधात अफवा पसरवण्याचे काम करण्यात येते. यातून राणे कुटुंब आणि दत्ता सामंत यांच्या मधील नात्यात दुरावा आणायचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत दत्ता सामंत यांचा रविवारी अभूतपूर्व गर्दीत झालेला वाढदिवस सोहळा आणि स्वतः राणे साहेब आणि नीलमताई राणे यांनी या सोहळ्याला दर्शवलेली उपस्थिती यांमुळे विरोधकांचे इरादे धुळीस मिळाले आहेतच, पण राणे साहेबांचे आपल्या लाडक्या दत्तावर असलेले प्रेम यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

दत्ता सामंत यांचा वाढदिवस रविवारी कुंभारमाठ येथील त्यांच्या निवासस्थानी साजरा झाला. सकाळच्या सत्रात दत्ता सामंत मित्रमंडळाच्या वतीने येथे रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते. या शिबिरात १०६ जणांनी रक्तदान केले. तर सायंकाळी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा ठेवण्यात आला होता. स्वतःच्या वाढदिवसाला सांस्कृतिक कार्यक्रम ठेऊन गर्दी जमवणे हे स्वतः दत्ता सामंत यांना आवडत नाही. त्यामुळे हा वाढदिवस अतिशय साधेपणाने ठेवण्यात आला. असे असतानाही जवळपास सहा ते सात हजाराची गर्दी या अभिष्टचिंतन सोहळ्याला लाभली होती. त्यामुळे याठिकाणची भव्यता वाढली होती. स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नीलम राणे यांनी स्वतः याठिकाणी उपस्थिती दर्शवल्याने हा वाढदिवस सोहळा यादगार ठरला. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3276

Leave a Reply

error: Content is protected !!