राज्यातील सत्तांतरानंतरच्या चार बजेट मध्ये कुडाळ – मालवण मतदार संघासाठी एक रुपयाही नाही : आ. वैभव नाईक

मतदार संघात सुरु असलेली रस्ता दुरुस्तीची कामे महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत मंजूर झालेली

भाजपाच्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी मार्चमध्ये येणाऱ्या बजेट मध्ये कुडाळ – मालवणसाठी निधी आणावा, आम्ही स्वागतच करू

वेंगुर्ल्यातील पाणबुडी प्रकल्पावरून राज्यातील मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही ; राज्याच्या पर्यटन मंत्र्यांनीच प्रकल्पाची माहिती गुजरातला दिल्याचा आरोप

मालवण | कुणाल मांजरेकर

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या चार बजेट मध्ये राज्य सरकारने कुडाळ मालवण मतदार संघातील रस्ते विकासासाठी एक रुपयांचा निधी देखील दिलेला नाही. या उलट नजिकच्या सावंतवाडी आणि कणकवली मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. कुडाळ मालवण मतदार संघात सुरु असलेले रस्ते महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केले आहेत. त्यामुळे आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा पूर्ण अधिकार आम्हांला आहे. भाजपच्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी येत्या मार्चमध्ये होत असलेल्या बजेट मध्ये कुडाळ मालवण साठी निधी मंजूर करून आणावा, नंतरच त्याचे श्रेय घ्यावे. आम्ही देखील खुल्या दिलाने त्याचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. वेंगुर्ल्यातील पाणबुडी प्रकल्पाबाबत राज्यातील मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांच्यातच एकवाक्यता नाही. पर्यटन मंत्रालय मंगलप्रसाद लोढा यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनीच पाणबुडी प्रकल्पाची माहिती गुजरात सरकारला दिल्याचा आरोप आ. नाईक यांनी केला आहे.

मालवण शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. नाईक बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, उमेश मांजरेकर, लारा देसाई, सन्मेश परब, अनंत पाटकर, दत्ता पोईपकर, मनोज मोंडकर, नरेश हुले तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत श्री. नाईक यांनी बजेटची पुस्तकेच सादर केली. यामध्ये एकतरी रूपयांचा निधी रस्त्यांसाठी आपल्या मतदार संघाला दिलेला असेल तर पहा असेही पत्रकारांना सांगत सत्ताधारी पक्षाकडून या मतदार संघावर थेटपणे अन्याय करण्यात येत आहे. फक्त सावंतवाडी आणि कणकवली मतदार संघासाठी निधी देण्यात आलेला असून येथील भाजपच्या नेत्यांनी अगोदर निधी आणावा आणि नंतरच भुमीपूजने व उद्घाटने करण्यासाठी धावावे असाही टोला श्री. नाईक यांनी मारला.

आचरा येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाची वर्कऑर्डर अद्याप झालेली नसताना निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांनी रस्त्याचे भुमीपूजन करणे दुदैवी आहे. पंतप्रधान ग्रामसडक आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तब्बल ३० कामांना गेले आठ महिने वर्कऑर्डर देण्यात आलेली नाही. या खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांच्या टक्केवारीच्या वादात या कामांची वर्कऑर्डर अडकून पडलेली आहे. यामुळे आपण गुरुवारी मंत्रालयात जावून या राज्याचे ग्रामविकास सचिव आणि मुख्य सचिव यांची भेट घेवून कामांच्या वर्कऑर्डर बाबत चर्चा करणार असल्याचेही श्री. नाईक म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्रेयासाठी भुमीपूजन करणे आपण समजू शकतो मात्र पालकमंत्र्यांनाही अशाप्रकारे वर्कऑर्डर नसलेल्या रस्त्याचे भुमीपुजन करण्यासाठी जावे लागत असेल तर ते दुदैवी आहे, असेही श्री. नाईक म्हणाले.

आम्हाला बॅनर आणि स्टीकर लावण्याची आवश्यकता नाही. मालवण कुडाळ मतदार संघातील जनतेला कोण काम करतो आणि कोण श्रेयासाठी धावतो हे सर्व माहिती आहे. आम्ही निधी आणला आणि निधीसाठी न्यायालयाचे दरवाजे थोटावले. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून मतदार संघातील प्रत्येक गावात कामे होण्यासाठी आमची धडपड असते. यासाठी जिल्हा नियोजनमधून मिळणारा निधी आणि शासनाकडून देण्यात येणारा निधी यातून आम्ही कामे करत असतो. आवश्यक असणारे सर्व रस्ते पूर्ण करण्यासाठी आमची तळमळ आहे. यामुळे आमच्यावर टिका करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आधी निधी आणावा आणि नंतरच आमच्यावर टिका करावी, असे श्री. नाईक म्हणाले. जिल्हा नियोजनचे सदस्य नसणारेही आपण पालकमंत्री असल्याप्रमाणे निधी आणल्याची भाषा करत आहेत. यातून जनता आणि कार्यकर्ते समजायचे ते समजून जातात असेही श्री. नाईक म्हणाले.

पाणबुडी प्रकल्प तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळे रखडल्याचे मंत्री उदय सामंत आणि दिपक केसरकर हे सांगत असतील तर गेली दोन वर्षे हा प्रकल्प होण्यासाठी तुम्ही काय केलात? असा सवाल श्री. नाईक यांनी उपस्थित केला. पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये होण्यासाठी राज्याच्या पर्यटन मंत्र्यांनीच माहिती गुजरात सरकारला दिली आहे, यामुळे तो त्याठिकाणी होत असेल तर बजेटमध्ये घोषणा करणाऱ्या केसरकर यांनी काय केले? हेही जाहीर करावे. दोन मंत्री सिंधुदुर्गात बोलतात तर पालकमंत्री मुंबईत बैठक घेतात, यातून या तिन्ही मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याचे दिसून येत आहे. जर मंत्रीच एकत्रित नसतील तर प्रकल्पाचे काय होणार? हे सिंधुदुर्गची जनता पाहिल असाही टोला श्री. नाईक यांनी मारला. सीवर्ल्ड प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता आणि आजही नाही, मात्र सिवर्ल्डच्या नावाखाली ग्रामस्थांच्या जमिनी हडप करण्याचा खेळलेला डाव आम्ही हाणून पाडला आहे, यामुळे कमी जागेत प्रकल्प करण्यास आमचा पाठिंबा असेल असेही श्री. नाईक म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!