निष्ठेचा सन्मान : अशोक सावंत यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती
मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सोबत मागील ३५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीने महाराष्ट्र शासनाचे उपसचिव नि. भा. खेडकर यांनी शासन अध्यादशाद्वारे ही नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये श्री. सावंत यांच्यासह शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, भाजपचे महेश सारंग, दिलीप गिरप आणि शिवसेनेच्या सचिन वालावलकर यांचा नियोजन समितीवर समावेश करण्यात आला आहे.
अशोक सावंत हे कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जातात. मागील ३५ वर्षे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात ते कार्यरत आहेत. त्यांनी मालवण पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष यांसह पक्षाच्या विविध पदांवर काम केले आहे. सध्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते का करीत आहेत. भाजपच्या वतीने मागील वर्षी आंगणेवाडी मध्ये आयोजित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेच्या आयोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच अलिकडे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यावेळी देखील एक महत्वपूर्ण रस्ता मार्गी लावण्यात अशोक सावंत यांनी प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा विशेष सत्कार देखील केला होता. पक्षाप्रती त्यांची असलेली तळमळ विचारात घेऊन भाजपच्या वतीने जिल्हा नियोजन समितीवर त्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.