शासकीय योजना राबवण्यात अपयशी ठरल्यानेच भाजपा कडून शासकीय यंत्रणाना वेठीस धरून स्वतःचा प्रचार 

हरी खोबरेकर यांची टीका ;  जनतेने रोष व्यक्त केल्याने गुन्हे दाखल होत असतील तर शिवसैनिक असे गुन्हे दाखल करून घेण्यास सदैव तयार

म्हणूनच आज मालवणात विकसित भारत संकल्प यात्रेला विरोध केला नाही ; नितीन वाळके

मालवण | कुणाल मांजरेकर

शासकीय यंत्रणांना वेठीस धरून भाजपने केंद्रात व राज्यात आपला प्रचार सुरू केलेला आहे. शासकीय योजनांच्या कागदपत्रांवर आजपर्यंत कधीही पंतप्रधानांचा फोटो छापण्यात आलेला नव्हता. मात्र मागील नऊ वर्षात सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात भाजप अपयशी ठरल्याने त्यांना आता शासकीय यंत्रणांची मदत घ्यावी लागत आहे. कुडाळमध्ये विकसीत भारत संकल्प यात्रेच्या गाडीवर मोदी सरकार लिहीलेले असल्याने जनतेने रोष व्यक्त केला होता, अशावेळी सर्वसामान्यांवर जर गुन्हे दाखल होत असतील तर शिवसैनिक असे गुन्हे दाखल करून घेण्यास सदैव तयार आहे. आणि यापुढे उत्स्फूर्तपणे आम्ही सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवून आंदोलने करणारच असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला.

शिवसेना तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. खोबरेकर बोलत होते. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर, उमेश मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, दत्ता पोईपकर, गणेश नेरूरकर, राहुल परब, गजानन नेवाळकर, भारती आडकर, सन्मेश परब तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाकडून जनतेच्या पैशांचा दुरूपयोग करून सध्या प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाबद्दल जनतेच्या मनात चांगल्या भावना निर्माण करण्यासाठी देशभरात अशाप्रकारे कामे सुरू आहेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अद्यापही सुटलेले नसल्याने जनतेकडून शासनाच्या योजनांच्या माहितीच्या कार्यक्रमाला विरोध केला जात आहे. जनतेचे पैसे जनतेसाठी प्रामाणिकपणे खर्च झाले असते तर आज ही वेळ भाजपवर आली नसती, असाही टोला श्री. खोबरेकर यांनी मारला, गेल्या नऊ वर्षात जनतेला दिलेल्या आश्वासनांवर एकही टक्का काम झालेले नाही. यामुळे आता जनतेच्या दरबारातून खाली हाताने जावे लागण्याची भिती भाजपला सतावत आहे. यामुळे सर्वत्र विरोध होत असतानाही भाजपकडून भारत संकल्प यात्रेचा प्रकार केला जात आहे. सध्याचे सरकार हे भुलभुल्लैया सरकार आहे, अशीही टिका श्री. खोबरेकर यांनी केली. केंद्राच्या सरकारबरोबर राज्याचेही सरकार धावत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुंबईच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा प्रकल्प अद्याप का पूर्ण केला नाही? असाही सवाल श्री. खोबरेकर यांनी उपस्थित केला आहे.

राम मंदिर व्हावे ही समस्त भारतीयांची इच्छा होती. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी योगदान दिलेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर बाबरी मशिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला आभिमान आहे. यात माझा हात नाही तर पायही आहे, असे स्पष्ट वक्तव्य केले होते. यामुळे भाजपने राम – मंदिराचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनाचा आणि मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा विषय होणे आवश्यक होते. मात्र सर्वच ठिकाणी राजकीय फायदा पाहणाऱ्या भाजपने राम मंदिराचाही मुद्दा निवडणूक रिंगणात आणला आहे. अर्धवट असलेल्या मंदिरात कार्यक्रम करून भाजप आता राजकीय फायदा उठवू पहात आहे. मात्र मतदार आता हुशार झालेला आहे. भाजपच्या सर्व चाली आणि त्यांचे खोटेपणा त्यांनी ओळखलेला आहे. राम मंदिराचे उद्घाटन रामनवमी दिवशी झाले असते तर तो महत्वाचा दिवस ठरला असता. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता जवळ असल्याने भाजपकडून राम मंदिराचा मुद्द पुढे करण्यासाठी हा सोहळा करण्यात येत असल्याचाही आरोप श्री. खोबरेकर यांनी केला.

…. म्हणून मालवणात आज वाद टळला : नितीन वाळके

मालवणमध्ये दाखल झालेल्या विकसीत भारत संकल्प यात्रेला रोखण्यासाठी शिवसेनेची ताकद तयार होती. मात्र मालवणात मोठ्या संख्येने पर्यटन सरत्या वर्षाला निरोप आणि नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दाखल झालेले असल्याने याठिकाणी वाद निर्माण झाल्यास त्याचा परिणाम पर्यटनावर होण्याची भिती होती, यामुळे आम्ही सर्व शिवसैनिकांना वादापासून दूर राहण्याची सूचना केली. तसेच – नेत्यांनाही याबाबत कल्पना दिली यामुळे आम्ही वाद थांबविण्यात यशस्वी ठरलो. – असे असले तरी जनतेच्या रोष भविष्याकाळात अधिक तीव्रतेने व्यक्त होण्यास वेळ लागणार नाही, असे शिवसेना नेते नितीन वाळके यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपकडून ज्या पद्धतीने लोकशाही संपविण्याचा डाव खेळला जात आहे, तो निषेधार्ह असून भविष्यात याच्या विरोधात तीव्र लढा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज आहेत, असेही श्री. वाळके म्हणाले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!