अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात हर्षोल्हासाने होणार नुतन वर्षाचे स्वागत
३१ डिसेंबर व १ जानेवारीला विविध धार्मिक कार्यक्रम ; मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे यांची माहिती
अक्कलकोट : नुतन वर्षाच्या स्वागताकरीता पाश्चिमात्य संस्कृतीच्या चालीरितींना फाटा देत कोल्हापूर, मुंबई व राज्यातील विविध भागातील स्वामी भक्तांच्या वतीने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रमांनी हर्षोल्हासात नुतन वर्षाचे स्वागत होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.
रविवार दि. ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व सोमवार दि. १ जानेवारी २०२४ रोजी नुतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी व नविन वर्षाच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, नागपूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली इत्यादी व राज्याच्या कानाकोपऱ्यातून व देशभराच्या अन्य ठिकाणांहून बरेच स्वामी भक्त येणार आहेत. दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळ यांचे भजन, व विविधरुपी सोंगी भारूड इत्यादी कार्यक्रम देवस्थान परिसरात होतील. रात्री ७.४५ वाजता महाराजांच्या शेजारतीस सुरुवात होईल. रात्री १० ते पहाटे ४ या वेळेत कोल्हापूर, मुंबई, पुणे येथील भजनी मंडळाचे नविन वर्षाच्या स्वागताचे भजन व भावभक्तीगीतांचा कार्यक्रम देवस्थान व परिसरात होतील. दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता कोल्हापूर व मुंबई येथील स्वामी भक्तांच्या वतीने गोड प्रसादाचे पदार्थ वाटप करुन व फटाक्यांची आतषबाजी करुन असंख्य स्वामी भक्तांच्या मुखाने ‘अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त सदगुरु स्वामी समर्थ महाराज की जय’ या जयघोषाने सन २०२४ या नविन वर्षाचे स्वागत करुन उपस्थित सर्व स्वामी भक्त शुभेच्छा व्यक्त करतील व या शुभमुहूर्ताप्रसंगी स्वामींच्या चरणी नतमस्तक होवून येणारे नविन वर्ष सुख समृध्दीने व भरभराटीने व्यतीत व्हावे याकरिता समर्थांच्या चरणी साकडे घालुन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात येईल. दि. १ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत भजन भारूड इत्यादी धार्मिक कार्यक्रम होतील. या प्रसंगी सर्व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरीता व सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरीता दिनांक ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी मंदिरात स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नसून स्वामी भक्तांच्या दर्शनाकरीता देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी नुतन वर्षानिमीत्त आयोजित या कार्यक्रमांचा लाभ घेवून व नुतन वर्षानिमित्त समर्थांचे दर्शन घेवून स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.