… तोपर्यंत आपला जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही !

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन 

सिंधुदुर्ग : आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर त्याला शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आणि जोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्या सक्षम होत नाही तोपर्यंत आपला जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केले. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक, जिल्हा परिषद – सिंधुदुर्ग, गोकुळ दुध संघ- कोल्हापुर व भगिरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळ सेवा दाता प्रतिनिधी यांची आढावा बैठक बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि गोपाळ सेवा दाता म्हणून काम करीत असताना जिल्हा बँक, जिल्हा परिषद, भगीरथ प्रतिष्ठान व गोकुळ प्रतिष्ठानचे एक प्रतिनिधी या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी तुमच्याकडे बघितलं पाहिजे असे काम तुमच्या कडुन केले गेले पाहीजे. 

यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर म्हणाले, जिल्हा बँकेने जो विश्वास तुमच्यावर टाकलेला आहे. तो विश्वास गोपाळ सेवादाता म्हणून काम करीत असताना गावातील पशुधन पालक शेतकऱ्यांना वाटला पाहीजे. ही फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे असे सांगुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीच्या प्रारंभी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांनी आपले मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना या विषयाची माहिती दिली. त्यानंतर ३६ दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीतील व प्रत्यक्ष काम करीत असतांना आलेले अनुभव गोपाळ सेवा दाता देवेंद्र पाताडे, शुभम कवठणकर, प्राची गुरव, अंकुश माजगांवकर, रामदास भोगले, रुपेश गावकर, प्रथमेश पाटील यांनी कथन केले. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुधाकर ठाकुर, डॉ. विद्यानंद देसाई, डॉ. तुषार वेंगुर्लेकर, डॉ. संतोष कुडतरकर, डॉ. गावकर, जिल्हा बँकेचे अधिकारी व जिल्ह्यातील गोपाळ सेवा दाता लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!