महावितरण भरती प्रकरण : कामगार नेते अशोक सावंत यांच्यासह १० राणे समर्थकांची निर्दोष मुक्तता

महावितरणच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये केले होते आंदोलन 

मालवण | कुणाल मांजरेकर

महावितरणच्या कामगार भरतीत कंत्राटी कामगारांसह स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी रत्नागिरीच्या महावितरण कार्यालयावर एक हजार लोकांचा मोर्चा काढून भरती प्रक्रिया थांबवल्याच्या आरोपातून कामगार नेते अशोक सावंत यांच्यासह १० राणे समर्थकांची रत्नागिरीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. अंबाळकर यांनी निर्दोष मुक्तता केली. अन्य आरोपींमध्ये संदीप शिवराम सावंत चिपळूण, सचिन माजळकर लांजा, सागर उर्फ बाळा दवंडे, अशोक वाडेकर, अमेय मसुरकर, मेहेताब साखरकर आय. टी. मयेकर यांचा समावेश होता. या सर्वांवर सीआरपीसी १४३, १४५, १४७, १४९, ३४१, ३५३, १८९, ५०४, ५०६, १४० नुसार दोषारोप ठेवण्यात आले होते. 

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदाच्या कामगार भरतीत कंत्राटी कामगारांसह स्थानिक मुलांनाही रोजगार मिळाला पाहिजे यासाठी २०१३ मध्ये तत्कालीन खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राणेसमर्थक आक्रमक झाले होते. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पराजिल्ह्यातील कामगारांची भरती थांबवण्यात आली होती. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात ही भरती सुरु असल्याचे समजताच तत्कालीन खासदार निलेश राणे यांच्या प्रेरणेतून २०१३ साली राणे समर्थकांनी कंत्राटी कामगार आणि स्थानिक मुलांना सोबत घेऊन रत्नागिरीच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी राणेसमर्थक असलेल्या वरील सर्वांनी एक हजार लोकांसह रास्ता रोकोही केला होता. त्यामुळे परजिल्ह्यातील कामगारांची भरती होऊ शकली नव्हती. या आंदोलन प्रकरणी राणे समर्थक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रत्नागिरी जिल्हा न्यायालयात २०१३ पासून याची सुनावणी सुरु होती. या दोषारोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. आरोपींच्या वतीने अ‍ॅड योगेंद्र गुरव, अ‍ॅड. सचिन थरवळ, अ‍ॅड लीना गुरव, अ‍ॅड अपूर्वा करंदीकर, अ‍ॅड स्वाती शेडगे यांनी काम पाहिले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!