राजकोट किल्ला तटबंदी आणि शिवपुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट

कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून दोषींवर कारवाई करा ; अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा ठाकरे गटाचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण मधील राजकोट किल्ला तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणी शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज मालवण तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच कारवाई न झाल्यास ठाकरे शिवसेना व शिवप्रेमी यांच्यातर्फे मालवण तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांना सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, सन्मेष परब, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, दीपा शिंदे, निनाक्षी मेतर, यशवंत गावकर, उमेश चव्हाण, दत्ता पोईपकर, प्रसाद चव्हाण, सचिन गिरकर, चिंतामणी मयेकर, हेमंत मोंडकर आदी व इतर उपस्थित होते.

मालवण शहरातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. पुतळ्याच्या सभोवताली बांधण्यात आलेली तटबंदी, चौथरा ढासळत चालली आहे. त्यामुळे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करणे म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान केला सारखा आहे. केवळ पैसे कमावण्यासाठी संबंधितानी हे काम केले असेल तर ते चुकीचे आहे, तटबंदी साठी वापरण्यात आलेला चिरा देखील कमी दर्जाचा असून बांधकामातील प्रक्रियेनुसार दगडांची सांगड न घालताच तटबंदी उभारण्यात आली आहे. त्यामुळे तटबंदीचे दगड ढासळत आहेत, असे यावेळी हरी खोबरेकर व पदाधिकाऱ्यांनी सांगत  या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच कारवाई न झाल्यास ठाकरे शिवसेना व शिवप्रेमी यांच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!