बंदर विभागाच्या मालवण जेटीवरील स्टॉल हटवण्याच्या भूमिकेने वादंग !
सतीश आचरेकर यांची मध्यस्थी ; तहसीलदारांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याची बंदर अधिकाऱ्यांची माहिती
सकारात्मक तोडगा न काढल्यास प्रसंगी उपोषण करण्याचा आचरेकर यांचा इशारा
मालवण : मालवण बंदर जेटी परिसरातील बंदर विभागाच्या जागेतील सर्व स्टॉल नौदल दिना पूर्वी हटविण्यात आले असताना नौदल दिन संपल्यावर स्थानिक स्टॉल व्यवसायिकांनी जेटी नजीकच्या किनाऱ्यावर तात्पुरते लावलेले काही स्टॉल काल रात्री बंदर विभागाचे अधिकारी हटविण्यास गेले असता वादंग निर्माण झाला. याबाबत आज सतीश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली स्टॉल व्यवसायिकांनी बंदर अधिकारी श्री. गोसावी यांची भेट घेतली असता किनाऱ्यावर असलेल्या बंदर विभागाच्या विश्रामगगृह बंगल्यासमोरील किनाऱ्यावर स्टॉल लावता येणार नसल्याचे गोसावी यांनी सांगितले. मात्र स्टॉलधारक जास्त असल्याने बंगल्यापासून पुढील किनाऱ्यापर्यंत स्टॉल लावण्यास मिळावेत, अशी मागणी व्यवसायिकांनी केली. याबाबत बंदर अधिकारी गोसावी यांनी याबाबत तहसीलदारांशी बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, बंदर विभागाने बंगल्यापासून पुढील किनाऱ्यापर्यंत स्टॉल लावण्यास परवानगी न दिल्यास प्रसंगी उपोषण केले जाईल, असा इशारा स्टॉल व्यवसायिकांच्या वतीने सतीश आचरेकर यांनी दिला आहे.
नौदल दिना पूर्वी मालवण बंदर विभागाकडून मेरी टाइम बोर्डाच्या आदेशाने मालवण बंदर जेटी परिसरातील बंदर विभागाच्या जागेतील व किनाऱ्यावरील स्टॉल हटविण्यात आल्यावर दिवाळीच्या पर्यटन हंगामात काही स्टॉल धारकांनी किनाऱ्यावर वाळूमध्ये तात्पुरते छोटेखानी स्टॉल उभारत व्यवसाय सुरु केला होता. मात्र हे स्टॉल हटविण्यासाठी बंदर अधिकारी गेले असता वरिष्ठांच्या सुचनेनुसार हे स्टॉल किनाऱ्यावर असलेल्या बंदर विभागाच्या विश्रामगृह बंगल्यापासून काही अंतर सोडून खासगी पार्किंग असलेल्या किनारी भागात लावण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार काही स्टॉल सुरु असून पर्यटन हंगाम लक्षात घेता पूर्वीच्या इतरही स्टॉल व्यवसायिकांनी स्टॉल लावले. काही स्टॉल विश्रामगृह बंगल्याच्या समोरील जागेत येत असल्याने हे स्टॉल हटविण्यावरून काल रात्री बंदर अधिकारी व स्टॉल व्यावसायिक यांच्यात वादंग झाला. या पार्श्वभूमीवर आज किनाऱ्यावर स्टॉल लावणाऱ्या व्यवसायिकांनी एकत्र येत बंदर अधिकारी गोसावी यांची भेट घेतली तसेच किनाऱ्यावरील जागेची पाहणी केली. यावेळी सतीश आचरेकर, रोहन आचरेकर, अरुण तोडणकर, जॉनी फर्नांडीस, एजाज मुल्ला, आनंद आचरेकर, प्रसाद सरकारे, हेमंत रामाडे, दीपक तांडेल, स्वप्नील आचरेकर, अनमोल आढाव, राजू वाघ, हेमंत सारंग, संतोष गोवेकर, फातिमा मुजावर, दीपाली मेथर, हेलन फर्नांडिस, नागेश परब, खुशबू आचरेकर, विल्सन फर्नांडीस, नुरू मुजावर, दीपाली आचरेकर, जयश्री सकपाळ, वैष्णवी कुबल, जर्ना वाघ बानी सारंग, जेनीफर फर्नांडिस, जेनेव्हा ब्रिटो, स्नेहा तोडणकर, दादा जोशी, विनिता पेडणेकर, मोहिनी आचरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सतीश आचरेकर म्हणाले, बंदर विभागाच्या सूचनेनुसार जेटी परिसरातील स्टॉल धारकांनी बंदर विभागाला सहकार्य करून स्वतःहून स्टॉल हटविले होते. मात्र नौदल दिनानंतर स्टॉल धारकांना जागा देण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आम्ही किनाऱ्यावर वाळूमध्ये तात्पुरते स्टॉल लावले आहेत. आम्ही स्टॉलधारक बंदर परिसरातील सर्वात पहिले व्यावसायिक असून गेली २० वर्षे स्टॉल चालवत आहोत. आम्हाला किनाऱ्यावर स्टॉल लावण्यास परवानगी मिळावी, असे सतीश आचरेकर म्हणाले.
यावर बंदर अधिकारी गोसावी यांनी काही स्टॉल किनाऱ्यावर असलेल्या बंदर विभागाच्या बंगल्यासमोरच्या जागेत लावल्याने आम्ही ते हटविण्याबाबत सूचना केल्या. बंगल्यासमोरच्या जागेत स्टॉल लावता येणार नाही, बंगल्यापासून ५० फुट अंतर सोडून पुढील किनाऱ्यावर स्टॉल लावण्यास हरकत नाही, असे सांगितले. यावर सतीश आचरेकर यांनी सध्या ज्या ठिकाणी स्टॉल लावले आहेत ती जागा आम्हाला पुरत नाही, तर त्या पुढील जागेत मच्छिमारी नौका उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे बंगल्यापासूनची जागा आम्हाला स्टॉल लावण्यास मिळावी, अशी मागणी केली. याबाबत स्टॉल धारकांची तहसीलदारांसमवेत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे बंदर अधिकारी गोसावी यांनी सांगितले.