पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सा. बां. ने अडीच कोटींची बांधलेली हेलिपॅड ठरलीत “पर्यटनस्थळे” !

मनसे नेते परशुराम उपरकर यांचा उपरोधिक टोला ; मोदींच्या दौऱ्या दरम्यान झालेल्या कामांच्या चौकशीसाठी वेळप्रसंगी लोकायुक्तांकडे दाद मागण्याचा इशारा

नौदल दिन शासनाचा की भाजपचा केला सवाल ; भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ते पहिल्या रांगेत तर भारत सरकारचा पद्म पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे तिसऱ्या – चौथ्या रांगेत का ?

मालवण | कुणाल मांजरेकर

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मालवणात सुमारे अडीच कोटी रूपयांची हेलिपॅड बांधली. ही हेलिपॅडच सध्या पर्यटन स्थळे बनली आहेत, असा उपरोधिक टोला मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवणात पत्रकारांशी बोलताना लगावला. यातील तीन हेलिपॅड दुसऱ्याच दिवशी हटविण्यात आलेली आहेत. कोट्यावधी रुपये खर्चून अशी कोणत्या स्वरूपाची हेलिपॅड बनविण्यात आली आहेत, याची सखोल चौकशी करण्यासाठी माहिती अधिकारात सर्व माहिती घेण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्या निमित्ताने झालेल्या विकास कामांच्या चौकशीसाठी वेळप्रसंगी लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे श्री. उपरकर यांनी स्पष्ट केले.

येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी श्री. उपरकर बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख प्रीतम गावडे, विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप लाड, प्रतिक कुबल, तथागत मालवणकर, भाग्यश्री लाकडे, जनार्दन आजगावकर, ओंकार चव्हाण, गौरव लाखम, वैभव आजगावकर, दिनेश तोंडवळकर, हरेश भिसळे, प्रशांत पराडकर, दुलाजी चौकेकर, राघव परब, हर्षद मिठबावकर, हरेश शिंदे, तेजस निकम आदी उपस्थित होते.

बांधकाम विभागाचे अधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी नौसेना दिन हा भाजपचाच असल्याप्रमाणे वागत होते. भारत सरकारने पद्मश्री किताब देऊन सन्मानित केलेले परशुराम गंगावणे यांना नौसेनेच्या कार्यक्रमात मागील रांगेत स्थान देण्यात आले होते. तर भाजप कार्यकर्त्यांना पुढील रांगेत स्थान देण्यात येवून एकप्रमाणे पक्षाचाच इव्हेंट असल्याप्रमाणे वागताना दिसत होते. यामुळे शासनाकडे याबाबत माहिती घेण्यात येणार आहे. बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची टेंडर प्रक्रिया न करता कोट्यावधी रूपयांची कामे पूर्ण केलेली आहेत, ही सर्व कामे दर्जाहिन झालेली असून याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या न्यायालयात स्टॅम्पपेपरवर लिहून द्यावे की किती दिवस ही कामे टिकणार? असाही सवाल श्री. उपरकर यांनी केला आहे. आम्ही जनतेचा आवाज बसून जनतेला सर्व गोष्टींची माहिती होण्यासाठी लढा देणार असल्याचेही श्री. उपरकर यांनी स्पष्ट केले.

शिवरायांच्या पुतळ्यात आवेशच नाही

नौसेनेच्या नावाखाली बांधकाम विभागाने उभारलेल्या शिवपुतळ्यामध्ये शिवप्रेमींना आवेशच दिसून येत नसल्याच्या अनेक प्रतिक्रीया सोशल मिडीयावर सध्या फिरत आहेत. घाईगडबडीत हा पुतळा उभारण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुतळ्याला फिनीशींग आणि इतरही गोष्टी दर्जेदार दिसून येत नाहीत. राजकोट किल्ल्याच्या उभारणीतील काही चिरे पडल्याचे आणि पुतळ्याच्या ठिकाणी बसविण्यात आलेली एक लादीही आल्याचे सोशल मिडीयावर दिसून येत आहे. यातून शिवपुतळ्याबद्दल लोकांच्या मनात तीव्र भावना असल्याचेही श्री. उपरकर यांनी सांगितले. नौसेनेचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून हा कार्यक्रम केलेला असेल तर शिवपुतळाही एखाद्या नौकेते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसमवेत स्वार असलेला पुतळा उभारण्यात आला असता तर आनंदच होता. छत्रपतींनी बांधलेले किल्ले वर्षानुवर्षे आपल्या पराक्रमाची साक्ष देत आहेत आणि बांधकाम विभागाने बांधलेल्या किल्ल्याचे काही चिरे कोसळले असल्याने त्या कामाच्या दर्जाबाबतच प्रश्न उपस्थित होत आहेत, असेही श्री. उपरकर यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!