अफवांना बळी पडू नका … राजकोट तटबंदी वरील “ते” दगड पडले नाहीत, कामासाठी काढलेले !

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण ; ग्रेनाईट बसवण्याचे काम सुरु , शुक्रवार सायंकाळपर्यंत काम पूर्ण होणार 

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि परिसराचे पावित्र्य राखण्याच्या कर्तव्यात कोणतीच तडजोड नाही

मालवण | कुणाल मांजरेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नौदल दिनाच्या निमित्ताने किल्ले राजकोटची पुनर्बांधणी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र या किल्ल्याच्या तटबंदीचे काही दगड पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आपली भूमिका मांडली आहे. वास्तविक हे दगड पडले नव्हते तर कामासाठी काढण्यात आले होते. ते पुन्हा व्यवस्थित बसवण्यात आले आहेत. किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि परिसराचे पावित्र्य राखण्याच्या कर्तव्यात कोणतीच तडजोड या विभागामार्फत केली गेली नाही. तरीही शिवप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांची मने दुखावल्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. या परिसराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आपली मते, मौलिक सूचना, अभिनव कल्पना अथवा विचार सार्वजनिक बांधकाम विभागास कळवावे. त्यावर उचित कार्यवाही करणेची नोंद घेणेत येईल. तमाम शिवप्रेमींना नम्र विनंती कोणत्याही अफवांना बळी पडू नये. असे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण सहाय्यक अभियंता श्रेणी 1 अजित पाटील यांनी केले आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभाग मालवणने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे, ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण येथे साजरा करण्यात आलेल्या भारतीय नौसेना दिवस निमित्ताने राजकोट किल्ल्यामध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमानंतर राजकोट येथील तटबंदीचे दगड खाली पडले असल्याचे व पुतळ्याच्या चौथऱ्याचे ग्रेनाईट अर्धवट अवस्थेत व तुटले असल्याचे फोटो बऱ्याच सोशल मिडिया साईटवरून फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शिवप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची नाहक बदनामी होत आहे. वास्तविकतः पुतळा व त्याच्या चौथऱ्याचे काम संपूर्णपणे नौसेना दलामार्फत करण्यात आलेले आहे. किल्याचा दरवाजा व तटबंदीचे काम सा. बां. विभागामार्फत करण्यात आले आहे. पुतळ्याचे अनावरण प्रसंगी कार्यक्रम व्यवस्थापकामार्फत तात्पुरते स्वरूपाचे भव्य लोखंडी स्टेज उभारण्यात आले होते. त्यावेळी लोकांना उभे राहण्यासाठी बनविलेल्या प्लेटफोर्म मुळे तटबंदीवरील काही उभे दगड काढून ठेवण्यात आले होते, सदरचे दगड पडले नाहीत. सदरचे काढून ठेवणेत आलेले दगड आता बसविण्यात आले आहेत. किल्ला व तटबंदीचे कोणतेच काम निकृष्ट झालेले नाही.तसेच अनावरणप्रसंगी चौथ-याच्या चारी बाजूने अवजड लोखंडी कॉलमवर पडदे बसविण्यात आले होते. अवजड लोखंडी कॉलम ग्रेनाईटवर ग्रीप न मिळता घसरतील यामुळे ग्रेनाईट बसविण्यात आले नव्हते. आता ग्रेनाईट बसविण्याचे काम सुरु असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत काम पूर्ण करणेत येईल. असे बांधकाम विभागाने सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!