राजकोट किल्ल्याच्या बांधकामातील त्रुटी तात्काळ दूर करा !
मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची मागणी ; मालवणात मनसेची बैठक संपन्न
मालवण | कुणाल मांजरेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवणात झालेल्या नौसेना दिवसाचे औचित्य साधून शहरातील राजकोट किल्ल्याचे नूतनीकरण करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या किल्ल्याच्या बांधकामातील काही त्रुटी मागील दोन ते तीन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही बाब अतिशय गंभीर आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे मालवणचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुरु असलेली चर्चा मालवणच्या नावालौकिकला हानिकारक असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या बांधकामातील त्रुटी तात्काळ दुरुस्त कराव्यात, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पत्रकार परिषदेत केली.
मालवण येथील शासकीय विशमगृहावर मनसेची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मनसेचे जिल्हा सचिव बाळा पावसकर, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालुकाध्यक्ष प्रीतम गावडे, विधानसभा सचिव सचिन सावंत, तथागत मालवणकर, लौकिक मेहथर, राहुल मोंडकर, रोहन तावडे, हर्षद परब, गणेश शिंगाडे, मनविसे शहरअध्यक्ष संदीप लाड आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर पक्षाच्या आदेशानुसार आम्ही संघटना बांधणीवर अधिक लक्ष दिले आहे. गावागावात संघटना उभी करण्यावर आमचा भर राहणार असून आगामी काळात मनसेची मजबूत संघटना उभी केली जाईल. लवकरच तालुका आणि जिल्हा कार्यकारणीच्या नियुक्त्या केल्या जातील, असेही धीरज परब यांनी सांगितले.