मालवणात उद्या नारळ बागायती शेतकऱ्यांची सभा
केंद्रीय नारळ विकास बोर्डामार्फत आयोजन
मालवण : केंद्रीय नारळ विकास बोर्डामार्फत गुरुवार दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कन्याशाळा सभागृह मालवण येथे नारळ बागायती शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला केंद्रीय नारळ बोर्डचे संचालक व महाराष्ट्राचे फिल्ड ऑफिसर उपस्थित राहणार आहेत.
नारळ लागवड विकासासाठी २०२३ – २०२४ या वर्षामध्ये नारळ बागायतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी केंद्र सरकारने खास म्हणून मालवण तालुक्याची निवड केली आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती, लागवड, वेगवेगळ्या नारळाच्या जाती, त्याचे उत्पादन, त्याची फळधारणा या योजनेमध्ये आवश्यक असणाऱ्या सरकारची भूमिका, आवश्यक असणारे अनुदान याची पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी तसेच श्रीफळ उत्पादन संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष रामानंद शिरोडकर, प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. या सभेस नारळ बागायती शेतकऱ्याकडे कमीत कमी बारा नारळाची झाडे व दहा गुंठे जागा आवश्यक आहे. अशाच बागायत आणि बागायतदारांनी उपस्थित रहावे. सभेसाठी येताना आधार कार्डची झेरॉक्स आणणे क्रमप्राप्त आहे.
सकाळी १० ते ११ पर्यंत नोंदणी, ११ ते १ माहिती व चर्चा असे सभेचे स्वरूप आहे. या सभेला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी केले आहे.