गांजा बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताची जामीनावर सुटका
आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, अक्षय चिंदरकर व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले
मालवण : कणकवली येथील उड्डाणपुलाच्या खाली सर्विस रोड वर 130 ग्राम गांजा सदृश्य अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी उमाकांत मुनेंद्रकमार विश्वकर्मा वय 24 वर्ष राह. सिलधारा, पहाडी खेरा, मध्यप्रदेश याची कणकवली मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेबानी रक्कम रुपये 15000/- च्या जामिनावर मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, अक्षय चिंदरकर व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.
दिनांक 10/12/2023 रोजी आरोपीस कणकवली पोलिसांनी गांजा विक्री करण्याच्या संशयाखाली अटक केले होते व त्याच्या ताब्यातून 130 ग्राम गांजा सदृष्य अमली पदार्थ जप्त केला होता. त्याप्रमाणे कणकवली पोलिस ठाण्यामध्ये गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणाआरे पदार्थ कायदा 1985 चे कलम 8(क), 20(ब)ii (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. दि. 11/12/2023 रोजी पोलिसांनी आरोपीस मे. कणकवली न्यायालयात हजर करुन तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र मे. न्यायालयाने पोलिसांची पोलिस कोठडीची मागणी फेटाळून आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर आरोपीतर्फे दाखल केलेला जामीन अर्ज सुनावणीअंती मे. न्यायालयाने मंजूर केला व आरोपीची रक्कम रू. 15000 च्या जामीनावर मुक्तता केली.