कुडाळ येथील अपूर्णावस्थेत असलेले मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह लवकरच पूर्णत्वास जाणार
भाजपा नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा ; पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून निधी वितरणासाठी शासकीय मान्यता
कुडाळ : महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने कुडाळ येथे सुरू असलेल्या मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचे काम गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थितीत होते. कुडाळ येथील नाट्यप्रेमी जनतेने या बाबत भाजपा नेते निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर निलेश राणे यांनी पाठपुरावा करत राज्याचे सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत कुडाळ येथील मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी अधिकच्या निधी वितरणाची मंजुरी देण्याबाबत चर्चा केली होती. त्या नुसार महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाच्या कामासाठी १७ लक्ष १० हजार एवढा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार लवकरच कामकाज सुरू होणार असून गेली अनेक वर्षे नाट्यप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह पूर्णत्वास जाणार आहे.