नौदलातील पदांना भारतीय पद्धतीची नावं तर नौदलाच्या गणवेशावर येणार शिवमुद्रा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तारकर्लीत दोन मोठ्या घोषणा ; दिमाखादार वातावरणात नौदल दिन साजरा

मालवण | कुणाल मांजरेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या नौदल दिन कार्यक्रमात त्यांनी दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. नौदलाच्या गणवेशावर आता शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल, तसेच भारतीय नौदल आता आपल्या पदांची नावे भारतीय परंपरे नुसार देणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली. यावेळी कोकण विकासाबाबत देखील त्यांनी भाष्य केले.

नरेंद्र मोदी आज प्रथमच कोकण दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर तारकर्ली मध्ये आयोजित नौदल दिन कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उदय सामंत, दीपक केसरकर, गिरीश महाजन, नीलम गोऱ्हे, नौदलप्रमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती वीर शिवाजी महाराज की जय, छत्रपती वीर संभाजी महाराज की जय, अशी घोषणा दिली. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गाचं महत्त्व, तसेच सिंधुदुर्गातील किल्ल्याचं महत्त्व सांगितलं. त्यांनी शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या गौरवाची गाथा सांगितली.

“छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आज भारत गुलामीच्या मानसिकताला मागे सोडून पुढे जात आहे. मला आनंद आहे की, आमचे नौदलाचे अधिकाऱ्यांच्या वर्दीवर छत्रपती शिवाजी महाराजांची झलक बघायला मिळेल. हे माझं भाग्य आहे की, नौदलाच्या ध्वजावर मला गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जोडण्याची संधी मिळाली होती. आता नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या अपोलेट्सवरही छत्रपती वीर शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. मला अजून एक घोषणा करताना आनंद होत आहे. भारतीय नौसेना आपल्या रँक्सचं नामकरण भारतीय परंपरेच्या अनुसार करणार आहे”, अशा घोषणा नरेंद्र मोदी यांनी केल्या.

“आम्ही सशस्त्र दलांमध्ये नारीशक्ती वाढवण्यावर जोर देत आहोत. मी नौदलाचं अभिनंदन करतो की, तुम्ही नेव्हल शिफमध्ये पहिली महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. आजचा भारत आपल्यासाठी मोठे लक्ष्य निश्चित करत आहे. ते मिळवण्यासाठी पूर्ण शक्ती लावत आङे. भारताजवळ या लक्ष्यांना पूर्ण करण्यासाठी एक मोठी ताकद आहे. ही ताकद 140 कोटी भारतीयांच्या विश्वासाची आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींच्या भाषणात कान्होजी आंग्रे, मायाजी नाईक भाटकर यांचा उल्लेख

“सिंधुदुर्गाच्या भूमीवरुन आज नौदल दिनाच्या शुभेच्छा देणं ही खूप मोठी घटना आहे. सिंधुदुर्गाच्या ऐतिहासिक किल्ल्याला पाहून प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने भरते. कोणत्याही देशासाठी समुद्र सामुग्री किती महत्त्वाची आहे याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांना होती. जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो तो सर्वात शक्तीमान आहे. त्यांनी एक शक्तिशाली नौसेना बनवली. कान्होजी आंग्रे असतील, मायाजी नाईक भाटकर असतील, असे अनेक योद्धा आजही आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहेत. मी आज नौसेना दिवसानिमित्ताने देशाच्या या वीरांना प्रणाम करतो”, असं मोदी म्हणाले.

“काल तुम्ही चार राज्यांमध्ये याच ताकदची झलक पाहिली. लोकांची भावना, आकांक्षा जुळते तेव्हा किती सकारात्मक परिणाम समोर येतात. वेगवेगळ्या राज्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. पण सर्व राज्यांचे लोक राष्ट्र प्रथम या भावनेने ओतप्रोत आहे. देश आहे तर आम्ही आहोत. देश पुढे जाणार तर आम्ही पुढे जाणार, अशीच भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे”, असं मोदी म्हणाले.

लोकांनी नकारात्मकतेच्या राजकारणाचा पराभव करुन प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा पण केला आहे. हाच पण आपल्याला विकसित भारताकडे नेत आहे. हाच पण देशाला तो गौरव देणार ज्याचा हा देश नेहमी हक्काचा आहे. भारताचा इतिहास फक्त 1 हजार वर्षाच्या गुलामीचा नाही. भारताचा इतिहास विजयाचा इतिहास आहे. भारताचा इतिहास शौर्याचा इतिहास आहे. भारताचा इतिहास ज्ञान, कला, कौशल्याचा, समुद्री सामर्थ्याचा इतिहास आहे”, असं मोदी म्हणाले.

“शेकडो वर्षांपूर्वी टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा महाराजांनी सिंधुदुर्गात किल्ले बनवले. एकेकाळी सुरतच्या बंदरावर 80 पेक्षा जास्त देशाचे जहाज होते. भारताच्या याच सामर्थ्याच्या आधारावर दक्षिण पूर्व आशियाच्या देशांनी आपला व्यापार वाढवला. विदेशी ताकदींनी आक्रमण केलं तेव्हा आपल्या संस्कृतीवर निशाणा साधला. जो भारत जहाज बनवण्यात प्रसिद्ध होता त्याची कला, कौशल्य सर्व काही ठप्प करण्यात आलं. भारत आता विकसित होण्याच्या लक्ष्यावर जात आहे, आपल्याला आपल्या गौरवाला परत आणायचं आहे. आमचं सरकार प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. भारत ब्लू इकॉनॉमीला प्रोत्साहन देत आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता बनण्याच्या दृष्टीने प्रवास करत आहे. अवकाश आणि समु्द्रात जगाला भारताचं सामर्थ्य दिसत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3276

Leave a Reply

error: Content is protected !!