आयुष्यभर काही पत्रकारांनी दोन भावांमध्ये आणि परिवारामध्ये भांडण लावायचाच प्रयत्न केला…


महाराष्ट्र टाइम्सच्या “त्या” बातमीवरून आ. निलेश राणेंचा संताप
मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेनेच्या कुडाळ मध्ये झालेल्या आभार मेळाव्यात बोलताना आमदार निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रकार महाराष्ट्र टाइम्सने केला आहे. या बातमी वरून आ. निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला असून आयुष्यभर काही पत्रकारांनी दोन भावांमध्ये आणि परिवारामध्ये भांडण लावायचाच प्रयत्न केला असल्याची टीका आपल्या एक्स अकाउंट वरून केलेल्या पोस्ट मधून केली आहे.

आ. निलेश राणे यांनी काल कुडाळ मध्ये झालेल्या शिवसेनेच्या आभार मेळाव्यात “मी सरकार मध्ये कोणाला फोन करत नाही. मदत मागायचीच असेल तर मंत्री उदय सामंत यांना फोन करतो” असे म्हटले होते. महाराष्ट्र टाइम्सने या वक्तव्याचा विपर्यास करून ” नितेश नव्हे सरकार मध्ये यांना निलेश राणे करतात पहिला कॉल” असे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वक्तव्याबाबत आ. राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. “अतिशय चुकीची बातमी, नितेश आणि मी एका घरात राहतो म्हणून भावाला फोन करायची गरज काय, आम्ही रोज भेटतो एक दुसऱ्याला. आयुष्यभर काही पत्रकारांनी दोन भावांमध्ये आणि परिवारामध्ये भांडण लावायचाच प्रयत्न केला.” असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

