तीन राज्याच्या निकालानंतर मालवणात भाजपचा “विजयोत्सव” !
केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंची उपस्थिती
विरोधकांनी आमच्यावर टीका करत रहावी. आम्ही जिंकत राहू ; ना. राणेंचा टोला
मालवण | कुणाल मांजरेकर
चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निकालामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने तीन राज्यांमध्ये मोठे यश मिळविले असून या निकालांच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी भाजपाने विजयोत्सव साजरा केला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे तसेच भाजपाचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधकांनी आमच्यावर टीका करत रहावी, आम्ही जिंकत राहू, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोधकाना लगावला. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील पुन्हा एकदा देशात भाजपाची सत्ता येऊन नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, असा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या मालवण येथील कार्यालयात रविवारी सायंकाळी भाजपाने विजयोत्सव साजरा केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, राजू राऊळ, बाबा परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, सौरभ ताम्हणकर, ललित चव्हाण, महेश मांजरेकर, आबा हडकर, पूजा करलकर, चारुशीला आचरेकर, दयानंद देसाई, राकेश सावंत, बबलू सावंत, तसेंच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेंच लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी ना. राणे म्हणाले, या देशात भाजपाला काटेकी टक्कर दयायला एकही पक्ष शिल्लक नाही. मध्यप्रदेश सह अन्य ठिकाणी भाजपला काटेकी टक्कर असेल असे चित्र म्हणजे फक्त पत्रकारांनी केलेली हवा होती, असे सांगून येत्या प्रत्येक निवडणुकीत भाजपची सत्ता येणार आणि लोकसभा निकालानंतर मोदी साहेब हेच पंतप्रधान असतील.
एक चिपळी घ्या आणि चिंतन करत बसा
विरोधी आघाडी आज हरली आहे. हा मोठा पराभव आहे. त्यामुळे आता हरला आहात, चिंतन करा एक चिपळी घ्या आणी बसा, असा टोला राणे यांनी लगावला आहे. चिंतन करा की काही करा. पण विरोधकांना यापुढे डोके वर करायला नको, असे आजचे रिझल्ट आहेत. महाराष्ट्रात देखील विरोधकांचा दारुण पराभव होणार. असून मातोश्रीचे पाचच्या वर आमदार होणार नाहीत, असे ते म्हणाले.