पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालवण दौरा ऐतिहासिक ; नारायण राणेंची प्रतिक्रिया

गुढ्या – तोरणे उभारून दिवाळीच्या सणाप्रमाणे त्यांचे उत्साही आणि जल्लोषी वातावरणात स्वागत करण्याचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण मध्ये प्रथमच नौसेना दिन साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून मोदी साहेबानी मालवणच्या किनारपट्टीची निवड केली असून मालवण साठी हा भाग्याचा दिवस आहे. या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण मध्ये येत असून प्रत्येक सिंधुदुर्गवासियासाठी हा भाग्याचा दिवस आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासियांनी दिवाळी सणाप्रमाणे गुढ्या आणि तोरणे उभारून त्यांचे स्वागत उत्स्फूर्त व जल्लोषात करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. मालवण येथील निलरत्न निवासस्थानी ना. राणे बोलत होते.

नौदल दिन मालवण येथे साजरा करण्याचे आदेश स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले असल्याने हा क्षण म्हणजे आपल्यासाठी भाग्याचा आहे. पंतप्रधान याठिकाणी येत असल्याने विकासाची अनेक दालने खुली होणार आहेत. देशाची सर्वोच्च महनीय व्यक्ती याठिकाणी येत असल्याने त्यांचे स्वागत तशाचपद्धतीने होण्यासाठी सर्व जिल्हावासियांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. आपण दिवाळी ज्या पद्धतीने साजरी करतो त्याचपद्धतीने सर्वांनी हा सोहळा दिवाळी सारखा आनंदात साजरा होण्यासाठी आपला सहभाग दर्शविणे आवश्यक आहे, असेही श्री. राणे म्हणाले, यावेळी भाजपा नेते दत्ता सामंत, सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, धोंडी चिंदरकर, अशोक तोडणकर, अशोक सावंत, बाबा परब, सुहास हडकर, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, निनाद बादेकर, निलीमा सावंत, आचरा सरपंच जेरॉन फर्नाडिस, संतोष गावकर, दिपक सुर्वे, अवि सामंत, निलेश खोत, निश्चय पालेकर, रवि मालवणकर, राजू बिडये, राजन गावकर, विजय निकम, संतोष मिराशी, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हयात येत्या काही महिन्यात महत्पपूर्ण असे प्रकल्प सुरू होत आहेत. केंद्रीय सुक्ष्म व लुघ उद्योग मंत्रालयाच्यावतीने आणि राज्य शासनाच्या सहकार्याने हे प्रकल्प मार्गी लागत आहेत. यामुळे हजारो हातांना रोजगार उपलब्य होणार आहेत. त्याचप्रमाणे ट्रेनिंग सेंटर एका शासकीय आणि एक खाजगी तत्वावरील सुरू होत आहेत, यातून प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना थेट मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. यासाठीही आवश्यक असणाऱ्या सर्व मान्यता घेण्यात आलेल्या असून लवकरच याही प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाचा कायापालट करण्याची क्षमता भाजप सरकारामध्ये असून केंद्र आणि राज्य सरकार तरूणांना रोजगार देण्याच्याच हेतून कार्यरत आहेत, असेही श्री. राणे म्हणाले.

चिपी विमानतळ बंद पडू देणार नाही

चिपी विमानतळ याठिकाणी आणखी एका कंपनीकडून विमानसेवा देण्याबाबत चर्चा सुरू आहेत. आपण चिपी विमानतळाचे स्वप्न पाहून ते पूर्ण केलेले आहे. यामुळे चिपी विमानतळ चांगल्यापद्धतीने कार्यरत होवून त्याचा फायदा स्थानिकांना होण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशिल आहोत. हे विमानतळ मी बंद पडू देणार नाही. सिंधुदुर्गात येणाऱ्या विरोधकांना कोणत्याही प्रकारे विकासाचे देणे घेणे नाही, फक्त टिका करून जनतेमध्ये विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता विरोधकांनाही जनतेने त्यांची जागा दाखवून देण्यास सुरूवात केलेली आहे. मालवण तालुक्याचा विकास हा पर्यटनातूनच होणार आहे. शिवपुतळा आणि मोरयाचा धोंडा या दोन्ही प्रकल्पांतून हजारो पर्यटक मालवणात येणार आहेत. यामुळे याठिकाणच्या प्रत्येक घरात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी मदत होणार आहे. जनतेने काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठिशी राहून सहकार्य केले पाहिजे, असेही श्री. राणे म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!