मोदींच्या दौऱ्या निमित्ताने आलेल्या करोडोंच्या निधीची काही ठेकेदारांकडून लुटमार
खा. विनायक राऊत यांचा आरोप ; विकास कामातील भ्रष्टाचाराची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार करणार
मालवण | कुणाल मांजरेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर रोजी मालवणात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण सिंधुदुर्गनगरी सज्ज झाली आहे. मात्र पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने निधीची खिरापत वाटली जात असून या निधीची लुटमार करण्यासाठी काही ठेकेदार मंडळी टपून बसली आहेत. शासन कर्त्यांचा आशीर्वाद असल्याने जो निधी येतोय, तो आपल्या घरचाच असल्याच्या आविर्भावात या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून जिकडे तिकडे पैशाची उधळपट्टी केली जात आहे. शहरातील रघुनाथ देसाई हायस्कुल ते राजकोट, बंदर जेटी या नव्याने तयार करण्यात आलेल्या दोन्ही रस्त्यांच्या कामात अक्षरश: थुक लावण्याचा प्रकार घडला असून या रस्त्यावरून एकदा बारा चाकी ट्रक गेला की हा रस्ता उखडून जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या रंगरंगोटीत देखील असाच प्रकार घडला आहे. एखादया कामाला चुना लावणे म्हणजे काय हे या कामाकडे पाहून लक्षात येईल, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मालवणात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या आडून केला जाणारा भ्रष्टाचार आम्ही पचू देणार नाही. या विकास कामातील भ्रष्टाचाराची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असून पंतप्रधान महोदय या कामांची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाला देतील, असा विश्वास खा. राऊत यांनी व्यक्त केला.
मालवण शहरातील भरड येथील मालवण हेरीटेज हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदे मध्ये खा. विनायक राऊत हे बोलत होते. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेच्या उपनेत्या जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, महेश जावकर, यतीन खोत, दिपा शिंदे, हेमंत मोंडकर, रश्मी परूळेकर, भाई कासवकर, करण खडपे, निनाक्षी मेथर, बाबी जोगी, सन्मेष परब, यशवंत गावकर, गणेश कुडाळकर, भगवान लुडबे, बंड्या सरमळकर, मनोज मोंडकर, संतोष अमरे, सुरेश मडये आदी उपस्थित होते. यावेळी खासदार राऊत म्हणाले, नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मी १८ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व १३ ऑक्टोबर रोजी नौदलाचे वेस्टन नेव्हल ऑफिसर यांना पत्र लिहिले होते. या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असलेल्या किल्ले सिंधुदुर्गची ढासळलेली तटबंदी मजबूत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सुवर्णमंडीत करावी अशी मागणी केली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ‘पद्मगड’ किंवा ‘धोनतारा’ येथे उभारण्यात यावा अशी मागणी केली होती. आज छत्रपती शिवरायांचा पुतळा राजकोट येथे उभारण्यात येत आहे. त्याबद्दल आपण समाधानी आहोत, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत किल्ले सिंधुदुर्गवर देशातील पहिले आरमार स्थापित झाले, त्या आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी यांचे स्मारक सिंधुदुर्ग किल्याच्या समोरील शासकीय जागेत व्हावे. त्याचप्रमाणे किल्ले सिंधुदुर्गचे भूमीपूजन ज्या ठिकाणी झाले तो ऐतिहासिक मोरयाचा धोंडा, रेकोबा घाटी येथील ढोपर कोपर तलवार या ऐतिहासिक स्थानांचे पर्यटन स्मारकात रूपांतर व्हावे. जेणेकरून महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात येतील अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे, असे ते म्हणाले.
किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छीमार प्रतिकुल परिस्थितीत जीवन जगून मासेमारी करत आहेत. परंतु राज्यातील सरकार यांत्रिकी मासेमारी, एलईडी, पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांची एक प्रकारे अवहेलना होत आहे. अनधिकृतरित्या एलईडी, पर्ससीन करणाऱ्या बोटी पकडून किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई बरोबरच फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा. नौसेना दिनाच्या कालावधीत किनारपट्टीवरील मासेमारी काही दिवसांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे मच्छीमारांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडूच्या धर्तीवर नोंदणीकृत बोटमालकांना रोख स्वरूपात नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आपली मागणी केली आहे, असेही खा. राऊत यांनी म्हटले आहे.