निष्ठेचं दुसरं नाव – हरी खोबरेकर !
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर वाढदिवस विशेष
कुणाल मांजरेकर | मालवण
“शिवसेना”… हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी रचलेल्या हिंदुत्वाचा या चार शब्दांनी प्रेरीत झालेल्या अनेक तरुणांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राजकीय आणि सामाजिक चळवळीत स्वतःला झोकून घेतलं आहे. यातीलच एक आघाडीचं नाव म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर ! मागील दोन वर्षात राज्यात अनेक राजकीय भूकंप झाले. यामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेमध्ये उभी फुट पडून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले. शिंदे गटाकडे पैसा, सत्ता, राजकीय पाठबळ सगळं काही असल्याने अनेकांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदे गटाचा आधार घेतला. मात्र स्व. बाळासाहेबांच्या विचारांनी भारलेल्या काहींनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशीच निष्ठावंत राहण्याचा निर्णय घेतला. हरी खोबरेकर हे यातीलच एक. दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचे गुण नसनसात भरलेल्या हरी खोबरेकर यांचा आज ३९ वा वाढदिवस ! हरी खोबरेकर यांनी केवळ मालवणच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपल्या नेतृत्वाची छाप यशस्वीपणे उमटवली आहे. सामाजिक कार्यातही ते नेहमीच अग्रेसर असतात. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोकण मिरर डिजिटल न्यूजच्या वतीने त्यांच्या जीवनप्रवासाचा थोडक्यात घेतलेला आढावा…
मालवण वायरी येथील एका सर्वसामान्य मच्छिमार कुटुंबात हरिश्चंद्र मोहन खोबरेकर यांचा जन्म झाला. मासेमारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानी प्रेरित झालेल्या हरी खोबरेकर यांनी शालेय शिक्षण पूर्ण होताच ऐन तारुण्यात शिवसेनेची वाट पकडली. गेल्या १५ वर्षाहून अधिककाळ ते पक्ष संघटनेत कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. संघटनेत कार्यकर्ता ते तालुकाप्रमुख हा त्यांचा राजकीय प्रवास तसेच लोकप्रतिनिधी म्हणून वायरी ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य हा प्रवासही युवा कार्यकर्त्यांसाठी कौतुकास्पद व आदर्शवत असाच आहे. ‘संघटना प्रथम’ हे धोरण त्यांचे नेहमीच राहिले. काहीवेळा तालुक्यातील कार्यकर्ता पदाधिकारी यांच्यावर हरी खोबरेकर यांचे रागावणे चिडणे अनेकांनी अनुभवले. काही वेळा काही कार्यकर्त्यांना हरी खोबरेकर यांच्या या स्वभावाचा राग ही यायचा. मात्र पक्षशिस्त धोरणानुसार काम करत असताना त्यांचे चिडणे योग्यच असल्याचेही अनेकांनी स्वतःहून सांगितले.
हरी खोबरेकर यांच्या पाच वर्षांच्या तालुकाप्रमुख पदाच्या कार्यकाळात पक्षाने अनेक चढउतार पाहिले. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचा विजय, शिवसेना महाविकास आघाडी सत्ताकाळ पाहिल्यानंतर वर्षभरापूर्वी राज्यात सत्तानंतर झाले. शिवसेनेत मोठी फूट पडली. काळ संघर्षाचा राहिला. मात्र हरी खोबरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ठाम राहिले. सत्तेची शाल घालून मिरवण्यापेक्षा निष्ठेची आणि विचारांची शक्ती घेऊन जनतेसोबत राहणे हेच आमचे कर्तव्य असल्याचे हरी खोबरेकर अभिमानाने सांगतात. सत्ता येते जाते मात्र आपले पाय जमिनीवर असले पाहिजे. जनतेत राहून त्यांचे सुखदुःख जाणून घेणे हेच आपले कर्तव्य राहील. एक निष्ठावंत कट्टर शिवसैनिक म्हणून जनतेत असलेली ओळख हेच आपल्यासाठी सर्वोच्च पद असल्याचे हरी खोबरेकर सांगतात. खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरु आहे.
शिवसेनेत तालुकाप्रमुख हे तालुक्याचे सर्वोच्च पद भूषवताना एक सर्वसामान्य कार्यकर्ता हीच भावना ठेवून हरी खोबरेकर यांचे काम सुरु आहे. आजवर जनतेच्या प्रश्नांना त्यांनी आक्रमक शैलीत वाचा फोडली असून प्रसंगी आंदोलन केले. जिथे गरज तिथे मदतीचा हात दिला. एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून हरी खोबरेकर निश्चितच यशस्वी ठरले आहेत. सामाजिक वाटचालीत रक्तदान चळवळीत देखील त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे राजकीय सीमा ओलांडून त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. अश्या या कर्तृत्ववान नेतृत्वाचा आज वाढदिवस.. हरी खोबरेकर आपली भावी राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक वाटचाल अशीच उत्तरोत्तर यशकीर्ती व मानसन्मान यांनी बहरत राहो. आपणास दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!