आचरा ग्रा. पं. निवडणूकीत भरमसाठ पैसा वापरून आणि खोटी आश्वासने देऊन भाजपची सत्ता
ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा आरोप ; शिवसेनेला साथ देणाऱ्या मतदारांचे मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने भरमसाठ पैसा वापरून आणि खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविल्याचा आरोप ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला आहे. आमचे उमेदवार थोड्याफार फरकाने पराभूत झाले असले तरी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आचरा गावच्या विकासासाठी शिवसेना यापुढेही सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आचरा ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना ठाकरे गटाने पहिल्यांदाच स्वबळावर लढविली आहे. या निवडणुकीत यश मिळाले नसले तरी थोड्या फरकाने आमचे उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजपच्या उमेदवारांनी आचरा गावातील काही प्रश्नांवरून मतदारांना भावनिक करण्याचा देखील प्रयत्न केला. मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ९०० पेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले होते. मात्र यावेळी भाजपचे मताधिक्य घटले असून २४२ मतांनी त्यांचा विजय झाला आहे. येणाऱ्या काळात आचरा वासियांचा विश्वास संपादन करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून यापेक्षाही चांगले काम करू आणि आचरा वासियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कायम पाठीशी राहू असे हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.