मालवणचे मच्छिमार्केट समस्याग्रस्त ; युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी वेधले पालिकेचे लक्ष !

पर्यटन हंगामाचा विचार करून दिवाळीपूर्वी समस्या दूर करण्याची मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेचे मच्छिमार्केट विविध समस्यांनी त्रस्त बनले असून यांमुळे मच्छिविक्रेते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आगामी काळात येणारा दिवाळी सण आणि त्यानंतर सुरु होणारा पर्यटन हंगाम या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी येथील समस्या दूर करण्याची मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी निवेदनाद्वारे मालवण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

मालवण शहरातील स्थानिकांचा मुख्य व्यवसाय हा मच्छीमारी असून या ठिकाणी मच्छी विक्री मोठ्या प्रमाणात होते. परंतु मालवण नगरपरिषद हद्दीत असलेल्या मच्छीमार्केटची अत्यंत दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी मच्छी विक्रेत्या महिलांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावून व्यवसाय करावा लागत आहे. याठिकाणी प्रवेशद्वारावर असलेला पाण्याचा नळ त्या ठिकाणाहुन काढुन एका बाजूला लावावा, जेणेकरून प्रवेशद्वारावर पाण्यामुळे घाण होणार नाही. तसेच मच्छिमार्केट मध्ये नळ आहेत, परुंतु त्यात पाणी येत नाही. त्या ठिकाणी असलेल्या प्रवेशद्वारावर दुर्गंधी पसरली असून गटाराचे पाणी वाहत आहे. याठिकाणी मोठी अस्वछता पसरली असून मच्छिमार्केटच्या आतमध्ये फ्लोरिंग लादी फुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे येथील व्यवसायिकांना अथवा ग्राहकांना इजा होऊ शकते. मच्छी मार्केटमध्ये असलेल्या शौचालयामध्ये तुटलेल्या लाद्या आहेत, त्यामुळे येथील व्यवसयिक व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.

तर मच्छिमार्केट परिसरातील अस्वछतेमुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसमोर मालवण शहराची बदनामी होत आहे. मच्छिमार्केट येथे काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून कोल्ड स्टोरेज बसविण्यात आले होते त्याचा वापर का होत नाही ? त्या ठिकाणी ते चालू स्थितीत का नाही ? यावर आपण लक्ष द्यावे. तसेच मच्छिमार्केटचा पहिला मजला हा नेमका कश्याकरिता आहे. त्याठिकाणी असलेले गाळे / दुकाने हे बंद का? यावर देखील आपण लक्ष द्यावे, अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपरिषदेकडे दिले आहे. या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!