दैदिप्यमान सोहळ्यात किल्ले राजकोट मधील शिवपुतळ्याची पायाभरणी

३२ गडकिल्ल्यांवरील पवित्र माती विधिवत पूजन करून शिवपुतळ्याच्या पायथ्याशी समर्पित

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे, आ. निरंजन डावखरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

“जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी दुमदूमला परिसर ; शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाच्या वेशभूषा ठरली लक्षवेधी

मालवण | कुणाल मांजरेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनानिमित्ताने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जात आहे. याचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील ३२ गडकिल्ल्यांवरील माती कलश आज (बुधवारी) वाजत गाजत राजकोट येथे आणून या मातीचे पूजन करून ती शिवपुतळ्याच्या पायथ्याशी टाकण्यात आली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या नेत्रदीपक सोहळ्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांसह अष्टप्रधान मंडळाची वेशभूषा लक्षवेधी ठरली. या निमित्ताने जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नौदलासह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी आपली पूर्ण ताकद आणी क्षमता वापरून मेहनत घेत असून या सोहळा अधिक यशस्वी करण्यासाठी मालवण वासिय आणि समस्त शिवप्रेमी जनतेची साथ हवी आहे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

राजकोटमध्ये उभारल्या जात असलेल्या शिवपुतळ्याच्या पायथ्याशी किल्ले रायगड, किल्ले शिवनेरीसह मालवण तालुक्यातील ३२ गडकिल्ल्यांवरील मातीचे कलश एकत्र करून करून आज वाजत गाजत आणण्यात आले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साजरा झाला. प्रथमत: देऊळवाडा सागरी महामार्ग येथे तालुक्यातून आलेल्या सर्व कलशांचे एकत्रीकरण करण्यात आले. यानंतर देऊळवाडा ते मेढापर्यंत कलशासह मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तर मेढा येथून मौनीनाथ मंदिर आणी राजकोट पर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढून हे कलश आणण्यात आले. या कार्यक्रमाला मेढा राजकोट भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

राजकोट येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते या कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर याठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये पालकमंत्री ना. चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा नेते दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाबा परब, विजय केनवडेकर, बाबा मोंडकर, अवी सामंत, उमेश नेरूरकर, पूजा सरकारे, पूजा करलकर, राजू वराडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, ममता वराडकर, विकी तोरसकर, सहदेव बापर्डेकर, जॉन नरोन्हा, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, ललित चव्हाण, राजू बिडये, सौरभ ताम्हणकार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना बाबा मोंडकर यांनी या कार्यक्रमा मागील भावना व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्री ना. चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशहितासाठी प्रत्येक पाऊल उचलताना दिसत आहेत. नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकी पूर्वी शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या रायगड भूमीत येऊन महाराजांचा आशीर्वाद घेतला. तर त्यानंतर पंतप्रधान पदाची शपथ घेताना संसदेच्या पायऱ्यावर नतमस्तक होऊन जनसेवक म्हणून काम करण्याची ग्वाही दिली.

स्वातंत्र्यानंतर गेली अनेक वर्षे नौदल दिन दिल्ली सह नजिकच्या परिसरात होत होता. पण मोदींनी यंदाचा नौदल दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्याचे ठरवले. छत्रपतींचे विचार फक्त बोलण्यात नाही तर आचरणात आणण्याचे काम मोदी करत आहेत. असे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ४ डिसेंबर रोजी आपल्या शहरात येत आहेत. नौदल अधिकारी स्वतःची पूर्ण ताकद आणि क्षमता वापरून हा दिन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांना तुमची आमची साथ हवी आहे.

येथील सर्व अधिकारी रात्रीचा दिवस करून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटत असून स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सर्व मंत्री ४ डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा किल्ला आणि महाराज आपली अस्मिता आहे. ती आपल्याला जपायची आहे. पुढच्या पिढीला द्यायची आहे. हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात न्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

४ डिसेंबरचा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय अधिकारी झटत आहे. या जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आमचे सर्व अधिकारी काम करून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावतील, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी देखील विचार मांडले. सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी केले. तर गणेश कुशे यांनी आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!