आचरा गावच्या राजकारणात नवीन पर्याय म्हणून सरपंच पदाच्या रिंगणात !
अपक्ष उमेदवार जगदीश तुकाराम पांगे यांची भूमिका ; मतदारांनी एकदा संधी देण्याचे आवाहन
आचरा | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. ग्रामपंचायतीच्या मागील दहा ते पंधरा वर्षाच्या राजकारणात तेच तेच चेहरे पाहून मतदारही कंटाळले आहेत. त्यांच्याकडून गावचा अपेक्षित विकास अद्यापही झाला नसून आता निवडून दिल्यास खरंच त्यांच्याकडून विकास होणार का ? असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने वेगळा पर्याय म्हणून मी सरपंच पदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून मागील २० ते २५ वर्षे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अभ्यासाच्या जोरावर गावचा विकास करण्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल. त्यामुळे माझ्या नावासमोरील बटण दाबून मतदारांनी मला गावचा विकास करण्यासाठी एकदा संधी द्यावी, असे आवाहन अपक्ष उमेदवार जगदीश तुकाराम पांगे यांनी केले आहे.
आचरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी तिरंगी लढत होत आहे. यामध्ये अपक्ष उमेदवार जगदीश तुकाराम पांगे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका मांडली आहे. जगदीश पांगे हे मुंबईमध्ये शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून दहा वर्षे कार्यरत होते. त्या निमित्ताने दादर मधील सेनाभवन मध्ये त्यांचा नियमित वावर होता. या माध्यमातून मंत्रालयापर्यंत त्यांच्या चांगल्या ओळखी असून मागील १५ वर्षे आचरा गावात येऊन येथील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय आहेत. शिवसेनेचे उपविभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे सांभाळली होती. आपल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अभ्यासाच्या बळावर त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल करून पक्षीय उमेदवारांसमोर तुल्यबळ आव्हान उभे केले आहे.
आपण मागील १५ वर्षात आचरा गावातील अनेक प्रश्न हाताळून स्थानिक लोकप्रतिनिधिंकडे पाठपुरावा करून ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला आहे. उद्या सरपंच पदी संधी मिळाल्यास जनतेचे प्रश्न शासन आणि प्रशासन पातळीवर आपण अधिक प्रभावीपणे मांडणार असल्याचे जगदीश पांगे यांनी म्हटले आहे.
असे आहे माझे गाव विकासाचे व्हिजन …
जगदीश पांगे यांनी सरपंच पदी निवडून आल्यास गाव विकासाची आपली संकल्पना मांडली आहे. यात सर्वात महत्वाचे उत्तम व सुसज्ज आरोग्य व्यवस्था निर्माण करणे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन खड्डेमुक्त रस्ते बनवणे, एसटीच्या माध्यमातून दळण वळणाची व्यवस्था उभी करणे, विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे, वाढत्या वस्त्यांमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य व्यवस्था करून कचरा मुक्त स्वच्छ सुंदर गाव बनवण्यासाठी प्रयत्न करणे, पर्यटनातून सुशिक्षितांच्या हाताला काम देणे, मत्स्यव्यवसायाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे अशा कामांचा समावेश आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक वर्षे तेच तेच नेते आपल्या समोर आहेत. मात्र आपण आचरा गावच्या विकासाचा ध्यास घेऊन सरपंच पदासाठी सक्षम पर्याय दिला असून मतदारांनी योग्य विचार करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन श्री. पांगे यांनी केले आहे.