… म्हणून निलेश राणे यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज !
माजी नगरसेवक दीपक पाटकर यांची प्रतिक्रिया
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपा नेते निलेश राणे हे कार्यकर्त्यात रमणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन अनेक जण आज राजकारणात सक्रिय झाले आहेत. अगदी अलीकडच्या काळात अन्य पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी निलेश राणे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन भाजपात आले आहेत. मात्र त्यांच्या राजकीय निवृत्तीच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. निलेश राणे यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. अन्यथा सुशिक्षित तरुणांचा राजकारणावरील विश्वास उडेल, अशी भीती भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी व्यक्त केली आहे.
भाजपा नेते निलेश राणे हे कार्यकर्त्यांना नेत्यापेक्षा मित्र वाटतात. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडतो. त्यामुळेच अलीकडच्या काळात इतर पक्षातील अनेक जण निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात दाखल झाले आहेत. मात्र आज निलेश राणे यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करीत अनेकांना धक्का दिला आहे. उद्या निलेश राणे हेच राजकारणात नसतील तर आमचा वाली कोण ? असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुणांची निराशा करणारा हा निर्णय असेल. त्यामुळे मालवण – कुडाळ मतदार संघाची देखील मोठी हानी होणार आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असे दीपक पाटकर यांनी आवाहन केले आहे.