तारकर्लीत समुद्रात बुडणाऱ्या तीन पर्यटकांना वाचवण्यात स्थानिकांना यश

रांजेश्वरमंदिर नजीकच्या समुद्रातील घटना ; ९ वर्षीय मुलीचा समावेश ; प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली रांजेश्वरमंदिर नजीक समुद्रात बुडणाऱ्या तीन पर्यटकांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. यामध्ये ९ वर्षीय मुलीचा समावेश आहे. के के वृंदा (वय ९, रा. बेळगांव) असे या मुलीचे नाव असून तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मालवण तारकर्ली रांजेश्वर मंदिर नजीक समुद्रात बेळगाव येथील पाच ते सहा पर्यटक पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यात तिघे तरुण व दोन लहान बालकांचा समावेश होता. यातील के. के. वृंदा ही खोल समुद्रात बुडाली असता तिचा मामा व आई पोहत तिला वाचविण्यासाठी गेले. मात्र हे तिघेजण बुडत असल्याचे पाहून तारकर्ली येथील गणपत मोंडकर, होमगार्ड रुक्मांनंद लोणे, वैभव सावंत, बाबली चोपडेकर, महेंद्र चोपडेकर व कांचन खराडे हे धावून गेले. त्यांनी बुडत असलेल्या सर्व पर्यटकांना पाण्याबाहेर काढले. तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. के के वृंदा हिची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर इतरांची प्रकृती सुखरूप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, सूरज रेडकर, महादेव घागरे, होमगार्ड शिल्पा मांजरेकर यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली.

गणपत मोंडकर पर्यटकांसाठी बनले देवदूत

मालवण तारकर्ली येथे पर्यटन हंगामात पर्यटक बुडाल्याच्या घटना वारंवार घडतात. पर्यटकांच्या बेशिस्तपणामुळे या घटना घडतात. आजही पर्यटक बुडल्याच्या घटना घडल्या. यावेळी तारकर्ली येथील गणपत मोंडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांना वाचविले. काही दिवसांपूर्वी पर्यटकांना वाचविल्याबद्दल मालवण पोलीस ठाण्यात त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी तारकर्ली समुद्रकिनारी पोलीस बंदोबस्त असावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. मात्र याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. गणपत मोंडकर हे बुडणाऱ्या पर्यटकांसाठी देवदूत ठरत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!