सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातलं “विशालपर्व” !
महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते विशाल परब वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष…
कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा ही नररत्नांची खाण म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक रत्नांनां जन्म दिला. देशाची संसद गाजवणारे बॅरिस्टर नाथ पै असो की मधू दंडवते… अलीकडच्या काळात सुरेश प्रभू यांच्यापासून निलेश राणे यांच्या पर्यंत कोकणच्या सुपुत्रानी दिल्लीच्या तख्ताला इकडच्या लाल मातीची ताकद दाखवून दिली. महाराष्ट्राची दोन्ही सभागृहे गाजवणारे कोकणचे भाग्यविधाते आणि सर्वांचे लाडके दादा अर्थात माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे हे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून देशाचे सर्वात शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात प्रभाविपणे काम पाहत आहेत. याच कोकणच्या लाल मातीत नव्याने तयार होत असलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजचं धडाडीचं युवा नेतृत्व म्हणजे भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल प्रभाकर परब ! आपला उद्योग व्यवसाय सांभाळताना आपणही समाजाचं काहीतरी देण लागतो, या भावनेतून सामाजिक क्षेत्रात त्यांची घोडदौड सुरु आहे. भाजपाची फायरब्रँड तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. आज १५ ऑक्टोबर रोजी त्यांचा ३५ वा वाढदिवस… यानिमित्ताने मागील आठवडाभर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. आज १५ ऑक्टोबरला सावंतवाडी मधील जिमखाना मैदानात त्यांचा अभिष्टचिंतन आणि गौरव सोहळा होत असून या सोहळ्याला भाजपा आणि शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच देशातील आघाडीचे गायक जुबीन नौटियाल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट अनुभवण्याची संधी यानिमित्ताने जिल्हा वासियांना मिळणार आहे. या वाढदिवस सोहळ्यानिमित्ताने कोकण मिरर डिजिटल न्यूजच्या वतीने त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा….
समाजसेवेची कास धरून आपला उद्योग व्यवसाय सांभाळताना समाजसेवेतून राजकारण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धडाडीचे युवा नेतृत्व म्हणजेच विशाल प्रभाकर परब. वडिलांचा व्यवसाय पुढे नेताना उद्योग क्षेत्रात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि सामाजिक भावनेतून त्यांनी जनतेच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील वाडोस या गावी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते सावंतवाडी शहरात आले. विशाल परब यांचे वडील प्रभाकर परब हे व्यवसायिक. त्यामुळेच विशाल यांनीही कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता व्यवसायातून आपले मार्गक्रमण केले. वडिलांच्या ठेकेदारी व्यवसायाबरोबरच अन्य व्यवसायातही आपले पाय घट्ट रोवून ते अल्पावधीत यशस्वी युवा उद्योजक बनले. उद्योग व्यवसायाच्या माध्यमातूनच त्यांनी आपली आर्थिक सुबत्ता गाठली. आपल्या व्यवसायातून माणगाव खोऱ्यातील अनेक युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रेरणेतून विशाल परब हे अन्य युवकांप्रमाणेच राजकारणातही ओढले गेले. आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी राजकारणातही आपली अनोखी छाप पाडली. आज निलेश राणे यांचे कट्टर शिलेदार म्हणून विशाल परब यांची जिल्ह्यात ओळख आहे. विशाल परब यांचे मन केवळ राजकारणात कधीच रमले नाही राजकारणाला समाजकारणाची जोड देत त्यांनी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजपयोगी कार्यक्रम राबविले.
विशाल परबांकडून अध्यात्मिक वारसा जपण्याचं कार्य
युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस सोहळा म्हणजे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीच असते. मागील वर्षीच्या वाढदिवस कार्यक्रमात प्रसिद्ध युवा कीर्तनकर चैतन्य महाराज यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर विशाल परब यांच्या पुढाकारातून मार्च महिन्यात भाजपा नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत महानाट्य आयोजित करण्यात आले होते. यंदाही वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करून विशाल परब यांनी आपली परंपरा जपली आहे.
माणगाव खोऱ्यात तसेच सावंतवाडी येथे शालेय विद्याथ्यांना शालेय साहित्य वाटप, रुग्णांसाठी विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, रुग्णांना विविध साहित्याचे वाटप या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजसेवेचा वसा नेहमीच जपला आहे. राणेसाहेबांचा अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता अशी विशाल परब यांची ओळख निर्माण झाली आहे. आज जरी ते सिंधुदुर्गात आपला उद्योग व्यवसाय सांभाळत असले तरी त्यांनी उद्योग क्षेत्रात घेतलेली भरारी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. केवळ राजकारण न करता उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचा त्यांचा वसा इतर युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आज राजकीय क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रात त्यांची वाटचाल सुरु आहे. आज १५ ऑक्टोबर रोजी सावंतवाडीत भव्य दिव्य स्वरूपात त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, भागवत कराड, श्रीपाद नाईक, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार सदानंद तानावडे, आमदार चंद्रकांत शेटये, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील अनेक नेते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व हे गुण ठासून भरलेल्या विशाल परब यांना उज्ज्वल भविष्य असून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी आमच्या लाख लाख शुभेच्छा !
पत्नी वेदिका यांची समर्थ साथ !
विशाल परब हे सामाजिक आणि राजकीय जीवनात स्थिरवण्याचा प्रयत्न करीत असतानाच २०१३ मध्ये सौ. वेदिका यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सौ. वेदिका ह्या उच्च शिक्षित आहेत. त्यांच्या रूपाने विशाल परब यांच्या घरात जणू लक्ष्मीच आली. त्यांच्या घरातील परिस्थिती बदलली. अनेक उद्योग धंद्यात त्यांनी गुंतवणूक केली आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना यश मिळाले. प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर आज विशाल परब राजकीय आणि सामाजिक जीवनात यशस्वीततेच्या शिखरावर पोहोचले आहेत. या यशात त्यांच्या पत्नी सौ. वेदिका यांचाही मोठा वाटा आहे. त्यांना भार्गवी आणि विराज अशी दोन मुले आहेत.