नितेश राणे, वैभव नाईकांनी राज्याच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा मतदार संघातील समस्यांवर लक्ष द्यावे !
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा सल्ला ; सिंधुदुर्गातील रुग्णालयांची परिस्थिती नांदेड सारखी होण्याची वेळ
सिंधुदुर्ग : मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि समस्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर टिकास्त्र सोडलं आहे.
नांदेडमध्ये जी आरोग्य दुर्घटना झाली तशीच अवस्था सिंधुदुर्गात होण्याची वेळ आली आहे. पालकमंत्री, सत्तेतील आमदार आपला दवाखान्याची घोषणा करतात. उदघाटने करतात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची बदनामी करतायत. पण तिथे आवश्यक औषध पुरवठा होतो काय ? याच्याकडे कोणाचे लक्ष नाहीय. शासकीय रुग्णालयात सुद्धा ४१ डॉक्टर पदे रिक्त आहेत. वर्ग ३ आणि वर्ग ४ ची पदे भरली गेली नाहीत. स्थानिक आमदार वैभव नाईक आणि नितेश राणे यांनी राज्यातील विषयावर बोलण्यापेक्षा मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष द्यावे असा सल्ला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.
१० अधिपरीचारिका स्टाफ मंजूर असतानाही केवळ ३ अधिपरीचारिका देवगड ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवा देत आहेत. अतिताणामुळे देवगडला अधिपरीचारिका संपावर जाणार म्हणतात ही लज्जास्पद बाब आहे. जिल्ह्याचे सुपुत्र केंद्रीयमंत्री आणि राज्यात मंत्री असूनही जिल्ह्याची आरोग्यसेवा सुधारु शकत नाहीत. विरोधी पक्षात असलेले खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी सत्तेत असताना १६०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या केलेल्या घोषणेचे काय झाले ? शासकीय वैद्यकीय कॉलेज घाईगडबडीत सुरू करून एमबीबीएस शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात आहे, असे सांगून सिंधुदुर्गातील जनता आता लोकप्रतिनिधींच्या फसव्या आश्वासनाला बळी पडणार नाही, असे श्री. उपरकर यानी म्हटले आहे.