सुऱ्याचा धाक दाखवत धमकावून देवस्थानची कागदपत्रे नेल्याच्या आरोपातून संशयित निर्दोष…

धामापुरातील घटना ; आरोपीतर्फे ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. अक्षय सामंत, ॲड.सुमित जाधव यांचा युक्तिवाद

मालवण | कुणाल मांजरेकर

धामापूर मोगरणेवाडी येथील अशोक संभाजी धामापूरकर यांना सुऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील भगवती देवस्थानची कागदपत्रे नेल्याप्रकरणी संशयित आरोपी कैवल्यप्रसाद राजन महाजन (रा. धामापूर महाजनवाडी) याची मालवण न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. अक्षय सामंत, ॲड.सुमित जाधव यांनी युक्तिवाद केला.

फिर्यादीनुसार, सदरील घटना २५ एप्रिल २०२२ रोजी सायं. ४ वाजता घडली होती. फिर्यादी अशोक संभाजी धामापुरकर हे त्यांचे घरासमोर अंगणात बसले असताना आरोपी कैवल्यप्रसाद राजन महाजन हा तेथे आला. यावेळी आरोपीने त्याच्या जवळ असलेला सुरा बाहेर काढून फिर्यादीकडे रोखला व श्री भगवती देवीच्या देवस्थानचे कागदपत्र दे, असे धमकावून सुरीच्या धाकाने फिर्यादीच्या ताब्यातील देवस्थानचे कागदपत्र आरोपी घेऊन गेला. व सुरीचा धाक दाखवून फिर्यादीस तक्रार दिलीस तर याद राख अशी धमकी दिल्याची तक्रार फिर्यादीने मालवण पोलीस ठाणे येथे आरोपी विरुद्ध दिल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध मालवण येथील मे. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्या कोर्टात भा. द. वि. कलम ४४७, ३८४, ५०६ अन्वये खटल्याचे कामकाज चालविण्यात आले. सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली.आरोपी विरुद्ध दोषसिध्दी करिता सरकार पक्षातर्फेचा पुरावा पुरेसा नसल्याचे कारणास्तव आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!