कुडाळ – मालवण विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंचा विजय २५ हजार पेक्षा जास्त मताधिक्याने निश्चित…

ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुखांकडून वरिष्ठांना खुश करण्यासाठी उसने अवसान आणून भाजपा नेत्यांवर टीकाटिप्पणी

दत्ता सामंत यांच्यावर टीका करण्याचे धाडस दाखवू नका, ते कृतीतून उत्तर देतात ; सुदेश आचरेकर यांचे प्रत्युत्तर

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यावर केलेल्या टिकेला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा पक्ष म्हणजे अथांग सागर आहे. पक्षात पक्ष प्रवेश करणाऱ्यांची संख्या दरदिवशी वाढत आहे. मात्र, याच्या उलट स्थिती ठाकरे गटाची आहे. ठाकरे गटात अपरिपक्व नेतृत्व व नेतृत्वावर कोणाचाही विश्वास न राहिल्याने कार्यकर्त्यांसह आमदार, खासदारही वेगळी वाट धरत आहेत. मालवण कुडाळ तालुक्यात हेच चित्र असल्याने भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने उसने अवसान आणून केवळ वरिष्ठाना खूष करण्यासाठी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख टिका टिपणी करत आहेत. मात्र, आता जनताही ठाकरे गटाच्या खोट्या आश्वासनाला व भुलथापाला कंटाळली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मालवण कुडाळ मतदार संघातून निलेश राणे यांचा विजय हा २५ हजार पेक्षा जास्त मताधिक्याने निश्चित आहे, असा दृढ विश्वास मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दत्ता सामंत यांच्यावर टीका करण्याचे धाडस करू नका, ते शब्दातून नव्हे कृतीतून उत्तर देतात, असे श्री. आचरेकर यांनी म्हटले आहे.

मालवण शहर भाजपा कार्यालय येथे मंगळवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत सुदेश आचरेकर यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी भाजपा उद्योग व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आपा लुडबे, पूजा सरकारे, विलास मुणगेकर, आबा हडकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिड्ये, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, पंकज पेडणेकर, प्रशांत परब, मंगेश यादव, संदीप मालंडकर, कमलेश कोचरेकर, सुधीर साळसकर, निनाद बादेकर, संजय कडू, ओंकार लुडबे आदी उपास्थित होते.

भाजपा नेते दत्ता सामंत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज भरताना असलेली गर्दी ही आमच्या पक्षाची ताकद दर्शवणारी होती. ती गर्दी बघून तुमच्या आमदारांची झोप उडाली. त्रेधात्रिपट झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या रॅलीत त्यावेळचे तुमच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते होते. यावरून आपण आत्मपरीक्षण केले बरे. दत्ता सामंत यांच्यावर टिका करण्याचे धाडस आपण दाखवू नका. दत्ता सामंत आपल्या कृतीतून व घेत असेलेल्या पक्षाप्रवेशाच्या कृतीतून उत्तर देत आहेत असेही आचरेकर म्हणाले.

सुदेश आचरेकर म्हणाले, ठाकरे गटाने आपल्याकडे कोण कार्यकर्ते शिल्लक राहिलेत का ? याचे मोजमाप आधी करावे. उठसूट टिका टिप्पणी करता त्यावेळी तुमच्या सोबत नगरपरिषदेतील मागील शिलेदार का नसतात ? केवळ चार टकली सोबत घेऊन तुम्ही वापरत असलेली भाषा ही तुमच्या पक्षाचे संस्कार दाखवणारी व जनतेचा अपमान करणारी आहे. भाजपामध्ये होत असलेले पक्ष प्रवेश तुमच्या पचनी पडत नसल्याने अस्वस्थता वाढल्याने आपण वाफा सोडत आहात. आपले पक्ष नेतृत्व अपरिपक्व आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या नादी लागून नाहक द्वेष करणे थांबवा. हाताला काठीही लागणार नाही, असाही टोला सुदेश आचरेकर यांनी लागावला.

भाजपा पक्ष संघटना व कुडाळ मालवण मधील निलेश राणे यांचे नेतृत्व यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहेत. आगामी काही महिन्यात २४ पक्ष प्रवेश होतील. असे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी जाहीर केले आहे. हे पक्ष प्रवेश होणारच. हिंमत असेल तर ठाकरे गटाने आपल्या पक्षाला लागेलेली गळती थांबवावी अशी बोचरी टिका सुदेश आचरेकर यांनी केली आहे.

आमदार वैभव नाईक यांनी गेली दहा वर्षे जनतेला खोटी आश्वासने देण्याचे काम केले. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कार्यकाळात मालवण कुडाळ मध्ये जी विकासाची गती पकडली होती ती ठप्प झाली. मात्र गेल्या वर्षभरात केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मोठा विकासनिधी येत आहे. अनेक विकासकामानी पुन्हा गती पकडली आहे. निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळच्या गतिमान विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असलेली कामे मंजूर होत असलेली कामे पूर्ण होत आहे. त्यामुळे जनतेचा ओढा, अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपकडे वाढत आहे. व पक्ष प्रवेश होत आहेत असे सुदेश आचरेकर यांनी सांगितले.

कुडाळ मालवण भाजप विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून अनेक लोक हिताचे उपक्रम राबविले जात आहेत. सवलतीच्या दरात अनेक वस्तू दिल्या जात आहेत. या सर्व उपक्रमांना मिळत असलेला प्रतिसाद ठाकरे गटाला झोंबत आहे. मात्र, त्यांनी जळफळाट करण्यापेक्षा स्वतः उपक्रम राबवावे. सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचे प्रयत्न करावा. जनतेसाठी चांगले करण्यासाठी आतातरी प्रयत्न करावा असा टोलाही आचरेकर यांनी ठाकरे गटाला लगावला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!