Malvan : कोकणातील सर्वात मोठ्या महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेचा उद्या मालवणात थरार…
शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाचे सलग नवव्या वर्षी आयोजन ; सोन्या-चांदीचा नारळ, सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ यासह अन्य बक्षिसांचा वर्षाव
ढोल ताशांच्या गजरात लुटता येणार स्पर्धेचा आनंद ; आकर्षक चषकाचे दिमाखात अनावरण
मालवण | कुणाल मांजरेकर
कोकणातील सर्वात मोठ्या तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या भव्य दिव्य स्वरूपातील महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेचा थरार उद्या ( बुधवारी) नारळी पौर्णिमेनिमित्त ३० ऑगस्ट रोजी सायं. ४ वाजता मालवणच्या बंदर जेटीवर अनुभवता येणार आहे. या स्पर्धेचे यंदा ९ वे वर्ष आहे. स्पर्धेतील खास आकर्षण असलेला सोन्या चांदीने मढवलेला नारळ, सोन्याचे कॉइन, सोन्याची नथ यांचा अंतर्भाव असलेला विजेता चषक तसेच सोन्याचा कॉईन, सोन्याची नथ असलेला उपविजेता चषक यासह अन्य सोन्या, चांदीच्या बक्षिसांचा दिमाखदार अनावरण सोहळा यतीन खोत यांच्या धुरीवाडा येथील निवासस्थानी महिला भगिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी सौ. प्रतिभा चव्हाण, सौ. चारुशीला आढाव, सौ. वैशाली शंकरदास, कोळंब सरपंच सौ. सिया धुरी, सौ. रूपा कांदळकर, शांती तोंडवळकर, नंदा सारंग , स्वाती तांडेल, सौ. कल्पिता जोशी, अश्विनी आचरेकर, चित्रा सांडव, प्रणाली गायकवाड, ज्योती तोडणकर, भाग्यश्री फोंडबा, तन्वी भगत, प्रीती बांदल, साक्षी मयेकर, मानसी घाडीगांवकर, दीक्षा जाधव, शिवानी सावंत यांसह अन्य महिला भगिनी उपस्थित होत्या.
स्पर्धकांना आयोजकांकडून मोफत नारळ
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आयोजकांकडून मोफत नारळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती सौ. शिल्पा खोत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आता सर्वत्र महिला सहभागतील नारळ लढवणे स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित होत आहेत. मात्र ९ वर्षांपूर्वी सौ. शिल्पा यतीन खोत यांनी महिला भगिनींना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे या हेतूने या स्पर्धेचे सर्वप्रथम भव्यदिव्य आयोजन केले. विजेता उपविजेता यांवर सोन्या चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव ठरणारी ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे. या स्पर्धेला लक्षवेधी दर्जा प्राप्त करून देण्यात शिल्पा खोत व सहकारी यशस्वी ठरल्या आहेत. यावर्षी स्पर्धेतील विजेत्या महिलेला सोन्या चांदीने मढवलेला नारळ, सोन्याचा कॉईन, सोन्याची नथ तर उपविजेत्या स्पर्धकास सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्राप्त स्पर्धकाला सोन्याची नथ तसेच अंतिम फेरीत पोहचलेल्या स्पर्धकांना चांदीची भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाणार आहे. यासह स्पर्धक व प्रेक्षक यांसाठी लकी ड्रॉ कुपन ठेवण्यात आले असून विजेत्यांना चांदीच्या भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
स्पर्धेला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार वैभव नाईक, जेष्ठ नेते भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे आदींची तसेच अन्य प्रमुख मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.