सिंधुदुर्ग एसटी विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक आरामदायी शयनयान बस दाखल
पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न ; दादा साईल यांची माहिती
कुडाळ : राज्याचे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निलेश राणे यांनी केलेल्या मागणीनुसार कुडाळ आगारासाठी प्रथमच सहा स्लीपर एसटी बसेस दाखल होणार आहेत. यापैकी एक शयनयान(स्लीपर) बस आज सिंधुदुर्ग आगारात दाखल झाली आहे. या बसेस एसटीच्या कुडाळ आगारातून पणजी-पुणे-निगडी, पणजी-लातूर आणि पणजी-बोरिवली या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा लांबपल्याचा प्रवास सुखकर होणार आहे, अशी माहिती भाजपाचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी दिली आहे.
एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहीनी समजली जाते. आता एसटीने देखील आधुनिकरणाची कास धरली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी स्थानकांचे नूतनीकरणाची कामे पूर्णत्वास जात असून नवीन बसेस देखील प्रवाश्यांच्या सेवेसाठी दाखल होत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग एसटी विभागाचे प्रमुख अभिजीत पाटील आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली होती. या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना चांगली आणि आधुनिक सेवा देण्यासाठी माजी खासदार तथा कुडाळ मालवण विधानसभेचे प्रभारी निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही सतत प्रयत्नशील राहू असे कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी म्हटले आहे.