तोच दरारा… तोच आक्रमकपणा… वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलचं दर्शन

ग्राहकांना त्रास दिलात तर खबरदार… कार्यालयात येऊन फटकवणार ; शिवसेनेचा खरमरीत इशारा

कुणाल मांजरेकर

शिवसेना म्हणजे आक्रमकपणा… शिवसेना म्हणजे दरारा… याच दराऱ्यावर शिवसेना उभी राहिली… परंतु, अलीकडे सत्तेच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शिवसेनेचा तो दरारा काहीसा विस्मृतीत गेला होता. मात्र थकीत वीज बिलांवरून ग्राहकांना अरेरावी करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना पूर्वीच्या शिवसेनेचा तोच दरारा अनुभवता आला. महावितरणच्या वीज बिल वसुली विरोधात शिवसेनेने मालवणात आक्रमक पवित्रा घेत कर्मचार्‍यांकडून ग्राहकांना उद्धट वागणूक, ग्राहकांना कल्पना न देताच वीज तोडणे तसेच अन्य प्रश्‍नांवर तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी महावितरणचे अभियंता गणेश साखरे यांना धारेवर धरले. ही वीज वसुली तात्काळ थांबवा. यापूढे अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना उद्धट वागणूक मिळाल्यास अधिकारी मार खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत असा थेट इशाराच शिवसेनेने वीज वितरणला दिला आहे.

महावितरणकडून थकीत वीज बिलांची वसुली मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली देऊळवाडा येथील महावितरणच्या कार्यालयात धडक देण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, पंचायत समिती सदस्या मधुरा चोपडेकर, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, शीला गिरकर, किरण वाळके, प्रसाद आडवणकर, प्रवीण लुडबे, यशवंत गावकर, नंदू गवंडी, किसन मांजरेकर, अंजना सामंत, विद्या फर्नांडिस, मकरंद चोपडेकर, तपस्वी मयेकर, सन्मेश परब यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील महावितरणची जी पदे रिक्त आहेत ती तत्काळ भरा अन्यथा वीज तोडणीचे आदेश देणार्‍या अधिकार्‍यांना तत्काळ येथे बोलावून घ्या अन्यथा आम्ही येथून जाणार नाही अशी भूमिका शिवसेना पदाधिकार्‍यांनी घेतली. महावितरणचे अधिकारी ग्राहकांवर जबरदस्ती करत आहेत हे योग्य नाही. तौक्ते चक्रीवादळ काळात नागरिकांनीच महावितरणला सहकार्य केले आहे त्यामुळे याची जाणिव ठेवून नागरिकांना सहकार्य करा. कोरोनाची लाट ओसरत असल्याने आता हळूहळू सर्व व्यवसाय सुरू होत आहेत. कोरोना काळात सर्वच व्यवसाय ठप्प राहिल्याने नागरिकांकडे पैसे नाहीत. आतापर्यत तालुक्यातील ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करत वीज बिले भरलेली आहेत. त्यामुळे जे ग्राहक आपल्या क्षमतेनुसार वीज बिले भरण्यासाठी येत आहेत. त्यांची वीज बिले भरून घ्यावीत. तालुक्यातील कोणत्याही ग्राहकाची वीज तोडणी करू नये अन्यथा पुढील परिणामांना सामोरे जा असा इशारा यावेळी देण्यात आला.
गणेशोत्सव काळात महावितरणच्या अधिकार्‍यांनी ग्राहकांशी उद्धट वागणूक करत जबरदस्तीने वीज बिले भरून घेतली आहेत. अनेक ग्राहकांनी आपले दागिने, उसने पैसे घेऊन वीज बिले भरली आहेत. कोणताही ग्राहक महावितरणची बिले ठकविणार नाहीत. त्यामुळे तालुक्यात तसेच शहरात सध्या सुरू असलेली वीज तोडणीची कारवाई तत्काळ थांबवा. अन्यथा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला महावितरण जबाबदार राहील असा इशारा श्री. खोबरेकर यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिला.

ज्या ग्राहकांची वीज तोडणी करण्यात आली आहे त्यांचा वीज पुरवठा कोणतेही शुल्क न घेता पूर्ववत सुरू करा. याबाबतच्या सूचना संबंधितांना द्या अशी सूचना श्री. खोबरेकर यांनी केली. वीज बिल वसुलीबाबत जर महावितरण सक्ती करत असेल तर रिक्त पदे भरून ज्या सुविधा ग्राहकांना तत्काळ मिळायला हव्यात त्या द्या. तुमच्यावर सक्तीसाठी जे अधिकारी दबाव टाकत आहेत त्यांना तत्काळ कार्यालयात बोलावून घ्या. आमच्या समस्या त्यांच्यासमोर आम्ही मांडतो असे शिवसेना पदाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी महावितरणचे अधिकारी श्री. साखरे यांनी वरिष्ठांशी संपर्क साधत याबाबतची माहिती दिली. त्यानंतर जे ग्राहक ५० टक्के किंवा १०० टक्के वीज बिले भरत असतील तर त्यांच्याकडून ती भरून घ्यावीत अशा सूचना दिल्या. त्यानुसार श्री. साखरे यांनी वसुली मोहिमेतील अधिकार्‍यांना जे ग्राहक वीज बिले भरत आहेत त्यांची वीज न तोडण्याच्या सूचना दिल्या. जे ग्राहक वीज बिले भरतच नाहीत त्यांचीच वीज तोडणी करावी असे सांगितले. तोक्ते वादळ काळात नागरिकांनी महावितरणला सहकार्य करत वाचविले. तसेच सहकार्य आता करत महावितरणला वाचवावे असे आवाहन श्री. साखरे यांनी यावेळी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!