मालवणात ३० ऑगस्टला महिलांची जिल्हास्तरीय नारळ लढवण्याची स्पर्धा ; सोन्या चांदींच्या बक्षिसांची खैरात…
विजेत्याला मिळणार सोन्या-चांदीचा नारळ, सोन्याचा कॉइन आणि सोन्याची नथ…
उपविजेत्या व अन्य स्पर्धकांवरही सोन्या, चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव…
मालवण | कुणाल मांजरेकर
येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने गेली ९ वर्षे आयोजित करण्यात येत असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्यदिव्य आयोजनातील जिल्हास्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धा यावर्षी नारळी पौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून बुधवार ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या महिलेला सोन्या चांदीने मढवलेला नारळ, सोन्याचा कॉईन, सोन्याची नथ तर उपविजेत्या स्पर्धकास सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्राप्त स्पर्धकाला सोन्याची नथ तसेच अंतिम फेरीत पोहचलेल्या स्पर्धकांना चांदीची भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाणार आहे. यासह स्पर्धक व प्रेक्षक यांसाठी लकी ड्रॉ कुपन ठेवण्यात आले असून विजेत्यांना चांदीच्या भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
माजी बांधकाम सभापती यतीन खोत आणि शिल्पा खोत मित्रमंडळाच्या वतीने मागील आठ वर्षांपासून महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. महिलांना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे, आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात असून दरवर्षी महिलांचा वाढत जाणारा सहभाग हेच या स्पर्धेचे यश आहे. ही स्पर्धा शिल्पा खोत मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केली जात असली तरी महिला वर्गाने महिलांसाठी आयोजित केलेली स्पर्धा असेच या लोकप्रिय स्पर्धेचे स्वरूप आहे.
स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित विविध मान्यवर, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी यांचा सहभाग नेहमीच राहिला आहे. सर्वांच्या सहभागातून या स्पर्धेची भव्य दिव्यता वाढत आहे. स्पर्धेसाठी महिलांना नारळ आयोजकांच्या वतीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. उपांत्य फेरीत दाखल होणाऱ्या चार स्पर्धकांना पुन्हा नव्याने प्रत्येकी पाच नारळ देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहिती व नावनोंदणीसाठी सौ. शिल्पा खोत मोबा : 890103330, 9422584641, सौ. प्रतिभा चव्हाण मोबा : 9307294569, ज्योती तोडणकर मोबा :
8956036393, तन्वी भगत मोबा : 8104500843 यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील महिला, मुली यांनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग दर्शवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे खास आकर्षण
तुषार योगेश आर्टस् निर्मित झी मराठी गाव गाता गजाली फेम आर्टिस्ट महाबली हनुमान आणि सोबत १२ फूट उंच कोंबडा हे या वर्षी स्पर्धेत खास आकर्षण असणार आहे.
सोन्या चांदीचा नारळ व अन्य बक्षिसांचे २८ ऑगस्टला अनावरण
नारळ लढवणे स्पर्धेचे खास आकर्षण असलेला विजेतेपदाचा सोन्या चांदीने मढवलेला मानाचा नारळ व सोन्याचे कॉइन, सोन्याच्या नथ तसेच अन्य बक्षिसांचे अनावरण सोमवार २८ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे.