शासकीय नोकरीत अनेक पर्याय ; विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेणे आवश्यक…
“एमआयटीएम” इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित शासकीय नोकरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात करिअर मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन
मालवण | कुणाल मांजरेकर
अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अपयश पचवून उभं राहायला शिकलं पाहिजे. शासकीय नोकरीतही खूप पर्याय आहेत. त्याचा फायदा घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. जर कोणाला व्यसन असेल, तर ते आजच सोडा आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आत्मासात करा, असे करिअर मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी एम.आय.टी.एम. कॉलेज सुकळवाड येथे आयोजित शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना केले.
जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM) कॉलेज सुकळवाड येथे करिअर मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांचा विद्यार्थ्यांना शासकीय स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य सूर्यकांत नवले, उपप्राचार्य पूनम कदम, उपप्राचार्य विशाल कुशे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. सत्यवान रेडकर यांनी २०० हून अधिक व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन केले असून त्यांच्या अमोघ वाणी व मार्गदर्शनाने प्रेरित होऊन असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षाकडे वळू लागले आहेत. त्यांच्या ज्ञानाचे भांडार आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, आणि विद्यार्थी सक्षम होण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन लाभावे यासाठी एमआयटीएमचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी या व्याख्यानाच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे भविष्य हे उज्ज्वलच असले पाहिजे असे मत प्राचार्य श्री. नवले यांनी या कार्यक्रमातून व्यक्त केले.
कोण आहेत सत्यवान रेडकर… ?
सत्यवान यशवंत रेडकर यांचा महाराष्ट्रातील सर्वात जास्त डिग्री संपादन करणाऱ्या प्रमुख नामांकित व्यक्तीमध्ये समावेश आहे. त्यांनी B.Com, M.Com, M.A. (Hindi), LLB, PGDHRM, PGDLL& IT, PGDT, M.A. [Translation Studies) यासारख्या पदव्या संपादन केल्या आहेत. मनुष्य हा कायम विद्यार्थी असतो या भावनेने प्रेरित होवून अजूनही त्यांचा शिक्षण प्रवास सुरु आहे. त्याना ज्युनियर डॉ. श्रीकांत जीचकर अशी उपमा दिली जाते. ते शासकीय नोकरीत कार्यरत असून ही त्यांनी उभारलेली स्पर्धा परीक्षा जागृतीची चळवळ अबाधित सुरु आहे. त्यांनी घेतलेला हा लोकजागृतीचा वसा खरोखरच वाखाण्याजोगा आहे.