मुंबई – गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ना. नारायण राणेंचा पुढाकार ; मुख्यमंत्र्यांशी चर्चा

महामार्गाची दुरुस्ती आणि प्रवाशांची सुरक्षितता यासाठी उपाययोजना राबवण्याबाबत संबंधिताना आदेश देण्याची मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर

गणेश चतुर्थी सण अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. मुंबईतून हजारोंच्या संख्येने चाकरमानी गणपती सणा निमित्त कोकणात येतात. मात्र यंदा मुंबई – गोवा महामार्गाची अवस्था दयनीय बनली असून महामार्गाच्या दुरुस्ती साठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. ना. राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महामार्गाच्या दुरुस्ती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली.

ना. राणे यांनी मुख्यमंत्र्यांना महामार्गाच्या दुरुस्तीसाठी निवेदन सादर केले आहे. यात म्हटले आहे की, संपूर्ण कोकणपट्ट्यात उत्साहाने व आनंदाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. मुंबई व परिसरात नोकरी-व्यवसाय करणारे लाखो चाकरमानी कोणत्याही अडचणी न जुमानता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील आपल्या गावांकडे धाव घेतात व त्यासाठी मुख्यतः मुंबई-गोवा महामार्गाचा (एन्. एच्. 66 ) वापर करतात. मुंबई-गोवा महामार्गाची सद्यस्थिती अतिशय दयनीय आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या महामार्गावर खड्डयांचे जाळे पसरले असून महामार्गाची चाळण झाली आहे. महामार्गाच्या या स्थितीमुळे राज्यभरातून कोकणात जाणा-या प्रवाशांचे हाल होणार असून अपघातही होऊ शकतात. वरील परिस्थिती लक्षात घेता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या व नंतर परतणा-या प्रवाश्यांचा प्रवास विना अडथळा व सुरक्षिततेने पार पडावा या दृष्टीने गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी तातडीने मुंबई-गोवा महामार्गाची ( एन्. एच्. 66 ) दुरुस्ती व सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावे, असे ना. राणे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

One comment

  1. खरोखर सन्माननीय राणेसाहेबांनी चांगल्या प्रकारे विनंती केलेली आहे खरोखर कोकण वाशी यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची सन्माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा पाहिजे ती दखल घेतीलच अभिनंदन

Leave a Reply

error: Content is protected !!