परप्रांतीय वाळू उपसा कामगारांवर गुन्हे दाखल करा
मालवण तहसील कार्यालयावर धडक ; परप्रांतीय वाळू उपसा कामगारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
मालवण : कालावल खाडी पात्रातील ग्रामस्थांची वस्ती असलेल्या खोत जुवा बेटाच्या बाजूला पुन्हा एकदा अनधिकृत वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. याबाबत ठोस कारवाई होत नसल्याने व वाळू उत्खनन सुरूच असल्याने संतप्त बनलेल्या खोत जुवा बेट येथील ग्रामस्थांनी बुधवारी मालवण तहसिल कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासमोर ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला. यावेळी उपसरपंच राजेश (पिंट्या) गांवकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. वाळू उत्खनन करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना महसूल व पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन शासकीय मालमत्ता वाळू चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी केली. सरपंच संदीप हडकर यांनीही ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका मांडत अनधिकृत वाळू उत्खनन प्रकरणी कडक कारवाईची मागणी केली.
यावेळी खोत जुवा बेत येथील ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तहसीलदार वर्षा झालटे यांनी अनधिकृत वाळू उत्खनन प्रकरणी कारवाई अधिक तीव्र केली जाईल. असे ग्रामस्थांना आश्वासीत केले. वाळू उत्खनन मार्गावर महसूल व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत पथके तैनात करण्याबाबत कारवाई केली जाईल. तसेच अनधिकृत वाळू उत्खनन व वाळू वाहतूक प्रकरणी कारवाई सुरू असल्याचे व डंपर पकडल्याचे तहसीलदार यांच्या वतीने सांगण्यात आले. अनधिकृत वाळू उत्खनन प्रश्नी खोत जुवा बेट येथील ग्रामस्थांनी तीन दिवसांपूर्वी अश्याच प्रकारे आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी तहसीलदार यांनी चार वाळू उपसा होड्यांवर कारवाई केली होती. खाडी किनारी महसूल पथकाने बुडवलेल्या होड्या पुन्हा बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर वाळू उत्खनन करणारे धमक्याही देतात अशी तक्रार उपस्थित महिलांनी तहसीलदार यांच्याकडे करून कारवाईची मागणी केली आहे.
ग्रामस्थ व सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत मर्डे यांनी भूमिका मांडताना सांगितले, मालवण तालुक्यातील कालावल खाडी मध्ये ग्रामपंचायत मर्डे हद्दीमध्ये खोतजुवा बेट असून त्यावरती सर्वसाधारण १४५ लोकसंख्या आहे. या बेटानजिक हडी कडील बाजूने मोठ्या प्रमाणांवर अनधिकृत वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे खोतजुवा ग्रामस्थांच्या वतीने सहीचे पत्र ग्रामपंचायतीजवळ प्राप्त झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार सदरचा अनधिकृत वाळू उपसा चालू राहील्यास बेटाला धोका पोहचू शकतो. याबाबत ग्रामस्थांनी सदरची बाब महसूल अधिकारी यांच्या निदर्शनास आणली. परंतु अद्यापपर्यंत त्यावर ठोस प्रकारची कार्यवाही झालेली नाही. सदरचा अनधिकृत वाळू उपसा हा परप्रांतीयांच्या माध्यमातून होत असून कारवाई करत असताना होडी व रॅम्प वरती केली जाते. सदरची कारवाई वाळू उपसा करणाऱ्या परप्रांतीयांवर कामगार यांच्यावरही करण्यात यावी. तसे न झाल्यास स्थानिक ग्रामस्थांचा रोष पाहता येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी उपोषण करण्यावाचून पर्याय राहणार नाही व त्यामुळे होणारी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी संबंधितांची राहील. असे निवेदन यावेळी देण्यात आले. दरम्यान तहसीलदार यांनी अनधिकृत वाळू उत्खननवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगत ग्रामस्थांनी उपोषण मार्ग स्वीकारू नये असे सांगितले आहे.