निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश ; चिंदर मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा मार्ग मोकळा
पशु संवर्धन विभागाच्या सचिवांकडून प्रस्ताव सादर करण्याचे संबंधित विभागाला आदेश
भाजपा नेते निलेश राणे यांनी पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वेधले होते लक्ष
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील चिंदर गावात काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची गुरे दगावण्याचा प्रकार घडला होता. या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी भाजपाचे कुडाळ मालवणचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांकडून प्रस्ताव सादर करण्याचे संबंधित विभागाला आदेश देण्यात आले असून यामुळे चिंदर येथील शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच चिंदर (ता. मालवण) येथील गुरांचा चाऱ्यातून विषबाधा होत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. चिंदर येथील एकूण ४८ शेतकऱ्यांची ५३ पेक्षा जास्त गुरे या विषबाधेमुळे दगावली होती. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करत चिंदर येथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.