धामापूर गावच्या सड्यावर कातळशिल्पांच्या पाऊलखुणा

हेरिटेज टुरिझमसाठी नवे दालन खुले होणार

मालवण (कुणाल मांजरेकर) मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या सड्यावर कातळशिल्पांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. सद्यस्थितीत सड्यावरील कातळावर दोन ठिकाणी चार कातळशिल्पांच्या चित्रकृती निदर्शनास आल्या असून इतिहास संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे.

मालवण तालुक्यातील धामापूर गाव हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट जंगले, नारळ-पोफळीची झाडे आहेत. दुतर्फा डोंगराच्याच मधोमध वसलेला ऐतिहासिक तलाव ही या गावची वैशिष्ट्य आहेत. तलावाच्या काठावर श्री भगवती देवीचे प्राचीन देवालय आहे. अलीकडेच धामापूर तलावाला ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’चा दर्जा देऊन महाराष्ट्राचा जागतिक सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक आणि प्राचीन पार्श्वभूमीवर असलेल्या धामापूरमध्ये कातळशिल्पांचा खजिना सापडल्याने हेरिटेज टुरिझमसाठी नवे द्वार खुले होणार आहे.

धामापूर, मोगरणे आणि साळेल या तिन्ही गावांच्या लांबलचक सड्यावर ही कातळशिल्पे दिसून आली आहेत. धामापूर गावच्या गोड्याचीवाडीच्या हद्दीत ही कातळशिल्पे आढळून आली आहेत. “कातळशिल्पे दोन-चार ठिकाणी आहेत, याबाबत आम्हाला कल्पना आहे. मात्र त्याबद्दल सविस्तर माहिती नाही,” असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. धामापूर तलाव आणि कातळशिल्पांचा प्राचीन ठेवा पर्यटनदृष्ट्या पर्वणी ठरणारा असून कातळशिल्पाच्या चित्रकृतीचा उलगडा होणे आवश्यक आहे.

साळेल गावचे ग्रामस्थ परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे हे धामापूर सडा परिसरात ‘अळंबी’ काढण्यासाठी फिरत असताना त्यांना ही कातळशिल्प निदर्शनास पडली. त्यांनी पत्रकार सिद्धेश आचरेकर यांना याबाबत माहिती दिली. पत्रकार आचरेकर यांनी धामापूर सड्यावर परेश गावडे यांच्या समवेत जाऊन कातळशिल्पांची पाहणी केली. याठिकाणी असलेली ख्रिस्ती धर्मातील ‘क्रॉस’च्या आकाराची चित्रकृती निदर्शनास येण्यासाठी आचरेकर, गावडे, अनिकेत पाटील (डोंबिवली) यांनी त्या चित्रकृतीच्या बाजूने गोलाकार दगड ठेवले. बाजूलाच गोलाकार स्थितीत कातळशिल्प कोरलेले आहे. त्याच ठिकाणाहून ५०० मीटरवर आणखीन एक भव्य कातळशिल्प कोरलेले आहे.

साळेलमधील युवकांकडून जागरूकता!

साळेल गावातील युवकांनी ही कातळशिल्पे उजेडात आणली. कातळशिल्पांच्या सभोवताली युवकांनी साफसफाईदेखील केली आहे. मात्र पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या परिसरात गवत उगवत आहे. कातळशिल्प आढळून आलेल्या परिसरात चिरेखाणी असल्याने कातळशिल्पे नष्ट होऊ शकतात. त्यामुळे अमूल्य ठेवा जोपासण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या कातळशिल्पांच्या ठिकाणी पोहचण्यासाठी साळेल, मोगरणे गावातून रस्ता आहे.

मालवण तालुक्यात सर्वाधिक कातळशिल्पे!

बहुतांशी कातळ शिल्पे ही उंच अशा माळरानावर म्हणजेच सड्यावरील कातळात कोरलेली असल्याने त्यांना कातळ शिल्पे असे संबोधले जाते. मालवण तालुक्यात आणखी काही ठिकाणी अशा प्रकारची कातळशिल्पे सापडू शकतात. मात्र अशा शिल्पांबाबत ग्रामस्थांमध्ये तेवढी जागरूकता व माहिती दिसून येत नाही. मात्र अशा शिल्पांचा शोध घेणे गरजेचे असून इतिहास संशोधकांची यामध्ये महत्वाची भूमिका राहणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!