मनिष दळवी :सहकार क्षेत्रातील उगवता तारा…
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष मनिष दळवी वाढदिवस विशेष…
कुणाल मांजरेकर / सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणाऱ्या वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा गावचे सुपुत्र असलेल्या मनीष दळवी यांचा आज ४१ वा वाढदिवस… केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षीच जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर जिल्हा बँकेला नावलौकिक मिळवून सिंहाचा त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच आज जिल्हा बँकेने ५ हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. मनीष दळवी हे नेतृत्व नुसतं तरुण नसून आपल्या मातीशी घट्ट नाळ असणारं, आधुनिकतेची कास धरत असताना ग्रामीण परंपरेचा आदर करणारं व स्वतःबरोबर समाजाने सुद्धा शिस्तीने वागावं असं आग्रह धरणारं, असं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ज्या वेगाने बँकेला आणि जिल्ह्याच्या सहकाराला पुढे नेण्याचं काम ते करत आहेत, ते पाहता भविष्यात पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने सिंधुदुर्ग जिल्हा देखील सहकार क्षेत्रात अधिराज्य गाजवेल, यामध्ये तिळमात्र शंका नाही.
मनीष दळवी यांच्या रूपाने वेंगुर्ला तालुक्याला प्रथमच जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची संधी मिळाली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या १८ महिन्यांच्या काळात ७४० कोटींची व्यवसाय वृद्धी करण्यात मनीष दळवी आणि त्यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाला यश आलं. हे यश म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टींचे नियोजन, सकारात्मक ऊर्जा, झटपट पण योग्य निर्णय या त्यांच्या असलेल्या वैशिष्ट्यांमुळे शक्य झालं आहे. सहकारात गेली अनेक वर्ष त्यांनी विविध संस्थांवर व विविध पदांवर काम केलं आहे त्यामध्ये होडावडे येथील श्री क्षेत्रपालेश्वर विविध कार्यकारी सोसायटी त्याचे उत्तम उदाहरण आहे. तिथे अनेक वर्षे संचालक व विद्यमान चेअरमन म्हणून म्हणून मनीष दळवी कार्यरत आहेत. सावंतवाडी कंझ्युमर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक, वेंगुर्ला खरेदी-विक्री संघाचे ५ वर्ष चेअरमन, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. कृष्णाई दुग्ध संस्था, होडावडा अशा विविध संस्थांचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी यशस्वी कार्य केले आहे.
सामाजिक व राजकीय पक्षाचे कार्य करताना केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्याचे ते अभिमानाने सांगतात.
निसर्गाचं वरदान लाभलेला जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची देशात कीर्ती आहे. कोकणी माणूस कष्टाळू आहे त्याला स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तर स्वतःच्या कष्टाने तो आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधेल हा विश्वास इथल्या तरुणांमध्ये द्यावा त्यासाठी मनिष दळवी सध्या प्रचंड मेहनत घेत आहेत. गोवा राज्य म्हणजे जगाच्या पर्यटन नकाशावर असलेले ठिकाण तिथे अनिवासी नागरिक म्हणजेच फ्लोटिंग पॉप्युलेशनचे प्रमाण प्रचंड आहे. सिंधुदुर्गातील लोक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दररोज गोव्यात जा-ये करता आहेत. विशेषतः युवा वर्ग चरितार्थासाठी रोजचा तीन चार तासांचा प्रवास करत आहेत. गोव्याशी असलेले भावनिक आणि व्यावहारिक नाते सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणणारे ठरावे यासाठी सर्वप्रथम तळकोकणात दुग्ध क्रांती व्हावी ही त्यांची इच्छा. कोकणातले दूध गोव्यातल्या मार्केटमध्ये गेले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावात आर्थिक सुबत्ता येईल त्यासाठी मनिष दळवी मेहनत घेत आहेत. जिल्ह्यात गावागावांत जाऊन तरुणांना एकत्र आणून दूध सोसायट्या स्थापन करण्यासाठी गावकऱ्यांना प्रवृत्त करत आहेत. त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना मार्केट उपलब्ध करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची अभ्यासू वृत्ती व सहकार क्षेत्रात आजपर्यंत केलेली वाटचाल पाहता जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने सध्या त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सहकार हा मनीष दळवी यांच्या अत्यंत आवडीचा विषय. त्यांच्याच अध्यक्षपदाच्या चालू वर्षात बँकेच्या ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्ष अखेरीस बँकेस रू. ३२०.९८ कोटींच्या नविन ठेवी प्राप्त होवून बँकेच्या एकूण ठेवी रु. २६०२.९२ कोटी एवढ्या झालेल्या आहेत. ठेवींच्या वाढीचे प्रमाण ७.३९% राहिल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा बँकांकडील ठेव वाढीचा वेग विचारात घेता, गतवर्षीच्या ठेव वाढीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूर व सातारा जिल्हा बँकांनंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. बँकेच्या कर्जव्यवहारामध्ये रू.२०१.०२ कोटींची वाढ होवून एकूण कर्जे रु.२२३५.१७ कोटी एवढी झाली आहेत. बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये रू.३८०.१८ कोटी भरीव वाढ झालेली आहे. बँकेच्या एकूण निधीमध्ये रू.७२.३७ कोटी एवढी वाढ होवून एकूण निधी ३५५.९२ कोटी एवढे झालेले आहेत. चालू वर्षी बँकेस ढोबळ नफा रु.९०.७२ कोटी एवढा झालेला असून आवश्यक सर्व तरतूदी केल्यानंतर बँकेचा निव्वळ नफा रू.२०.२१ कोटी एवढा आहे. चालू वर्षी बँकेच्या ढोबळ एनपीएच्या प्रमाणामध्ये १.१७% एवढी घट झाली असून बँकेच्या ढोबळ एनपीए चे प्रमाण ३.५६% तर निव्वळ एनपीएचे प्रमाण ०.००% आहे. बँकेच्या भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (सीआरएआर) १०.८३% एवढे असून विविध आर्थिक निकषांची पूर्तता नियमितपणे करून याही वर्षी बँकेस वैधानिक लेखापरिक्षणामध्ये ‘अ’ ऑडिट वर्ग मिळालेला आहे.
मागील ४० वर्षांच्या वाटचालीमध्ये बँकेने जिल्हयातील सर्व घटकांचा विचार करून विविध योजनांद्वारे उत्तमोत्तम बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आधुनिक बँकिंगचा वेळोवेळी अंगिकार करून ग्राहकांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या बरोबरीने आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामुळेच मागील १८ महिन्यात रू. १०११ कोटींच्या व्यवसाय वाढीसह मोठे उद्दिष्ट बँकेने गाठले आहे. यामुळे मागील बऱ्याच कालावधीपासून ठरविलेले रु.५००० कोटींचे व्यवसाय गाठण्याचे उद्दिष्ट पूर्णत्वास आले असून कोकणातील अग्रगण्य बँक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक पुढे आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाटचालीत हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सध्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले आहेत. यात खावटी कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता करणे, शेतकऱ्यांची दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती करण्यासाठी विविध नवीन योजना आणणे, जिल्हा बँक थेट शेतकऱ्यांच्या दारी, अत्याधुनिक डिजिटल सुविधा असे अनेक विविध योजना मनीष दळवी हे सध्या राबवत आहे. यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मेळावे घेऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे तर शेतकऱ्यांसाठी असलेल्या विकास संस्थांना अधिक बळ देण्याच्या दृष्टीने त्यांचे विविध प्रयत्न सुरू आहेत. सहकार चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी ते जिल्हाभर फिरत आहेत. जिल्हा बँक आर्थिक भार उचलेल पण शेतकऱ्यांसाठी असलेल्या विकास संस्था सक्षम होऊन कर्ज वाटप व वसुली अशा सर्वच बाबतीत विकास संस्थांनी आघाडीवर राहावे असे त्यांचे ठाम मत आहे. विविध विकास संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. अनेक विकास संस्थांची पॅनेल निवडून आणण्यात मनीष दळवी यांचा मोठा वाटा आहे.