महसूल सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच सेवा द्या
गौरव सोहळा व महसूल दिन सप्ताह शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती मंजुलक्ष्मी यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : शासन अनेक कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असते. शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यामध्ये महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे. या अनुषंगाने 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह’साजरा करण्यात येतो. या सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव सोहळा व महसूल दिन सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सन 2022-23 मध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार देखील करण्यात आला. या प्रसंगी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी करिष्मा नायर, विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी श्रीमती एैश्वर्या काळुशे, उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाल्या, महसूल सप्ताहाच्या माध्यमातून सर्व तहसिलदार, मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अतिदुर्गम भागात शिबीराचे आयोजन करावे. या शिबिराच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त दाखले इतर योजनांचा लाभ द्या. त्यांना सेवा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करा जेणेकरुन नागरिक आणि प्रशासनामध्ये आणखी जवळीकता निर्माण होईल. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र त्यांच्या घरी जाऊन द्यावे असेही त्या म्हणाल्या. सर्वांनी काम करताना स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वांनी नियमित आरेाग्य तपासणी करावी, नियमितपणे व्यायाम, योगा करावा जेणेकरुन आपली कार्यक्षमता चांगली राहील आणि आपण नागरिकांना सेवा देण्यास तत्पर राहू असेही त्या म्हणाल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी प्रास्ताविक केले. महसूल सप्ताहानिमित्त युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल सवंर्गातील कार्यरत/ सेवा निवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्या समस्या सोडविणे अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वत: आरोग्य तपासणी केली आणि सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन देखील केले.