दांडी येथील मोरेश्वर देवस्थानचा परिसर झळाळणार ; नारायण राणेंच्या खासदार निधीतून ५ लाख मंजूर
भाजपा नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पाठपुरावा ; देऊळवाड्यातील दाभोळकर घर ते मोर्ये घराकडील गटाराच्या कामालाही ५ लाखांचा निधी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील दांडी येथील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या मोरेश्वर देवालयाकडील हायमास्ट टॉवरच्या कामाला भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पाठपूराव्यातून चालना मिळाली आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम २०२१-२२ च्या निधीतून या कामाला ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मोरेश्वर देवालयाचा परिसर झळाळणार आहे.
मोरेश्वर देवालयाला शिवकालीन महत्व आहे. याठिकाणी हायमास्ट टॉवर बसवण्याची मागणी येथील नागरिकांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्यामार्फत केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम २०२१-२२ च्या निधीतून या कामाला ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल येथील नागरिकांनी ना. राणे, माजी खा. निलेश राणे आणि माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, देऊळवाडा येथील दाभोळकर घर ते मोर्ये घराकडील गटाराच्या कामालाही ना. राणे यांच्या खासदार निधीतून श्री. पाटकर यांच्या प्रयत्नातून ५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या दोन्ही कामांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते दत्ता सामंत यांचेही सहकार्य लाभल्याची माहिती दीपक पाटकर यांनी दिली.