आपत्कालीन निधीतून स्वतःचे डंपर फिरण्यासाठीच वैभव नाईक उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार ?

मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा सवाल ; मागील वर्षी आपत्कालीन निधीतून फिरणारे डंपर कोणाचे होते ?

आ. नाईक प्रत्येकवेळी आपत्कालीनचा निधीच वापरणार काय ?आमदार फंड खासदार फंड का देऊ शकत नाहीत ?

मालवण | कुणाल मांजरेकर

तोंडवळी तळाशील येथील ग्रामस्थांच्या उपोषणावेळी वैभव नाईक तिथून पळून गेले होते. त्यावेळी आपत्कालीन निधीतून बंधारा बांधण्यात येईल असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले होते. तसेच किनारपट्टी व नदीकडील भागातून भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जातील असेही सांगितले होते, त्याचे पुढे काय झाले हे आमदारांनी स्पष्ट करावे. आपत्कालीन निधीतून स्वतःचे डंपर फिरावेत यासाठी आमदार जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत अशी खरमरीत टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

ज्यावेळी ग्रामस्थ जीव मुठीत धरून असतात, त्यावेळी आपत्कालीन निधीतून काम केले जाईल अशा प्रकारचे वक्तव्य आमदार वैभव नाईक करतात. इतर वेळी आमदार फिरकत देखील नाही. जेटी लाटांच्या तडाख्यात वाहून जाणार हे माहीत असताना होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना का केली नाही ?प्रत्येकवेळी आपत्कालीनचा निधी वापरणार काय ?आमदार फंड खासदार फंड का देऊ शकत नाही ? सभागृहात प्रश्न का उपस्थित करू शकत नाहीत? मागील काळात सरकार असताना निधी का आणू शकले नाहीत?पतन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तळाशील तोंडवळी संबंधी बैठका का घेत नाहीत ? मागच्या वेळी आपत्कालीन निधीतून काम सुरू असताना त्या कामावर फिरणारे डंपर कोणाचे होते हे ग्रामस्थांना माहित आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा आपत्कालीन निधीतून काम सुरू असताना आपले डंपर फिरावेत यासाठी आमदार सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत का ?

तळाशील तोंडवळी येथील ग्रामस्थांनी वैभव नाईक यांना निवडून दिले आहे. दरवर्षी ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली असतात. पावसाळ्यामध्ये होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आमदारांकडून उपाय योजना करणे आवश्यक होते. परंतु ते होताना दिसत नाही. दुसरीकडे राणेपुत्र १० दिवसांमध्ये १० कोटी आणणार अशी घोषणा करतात त्या १० कोटीचे पुढे काय झाले ते त्यांनी सांगावे. हे दोन्हीही आजी माजी लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना फसवत आहेत. आमदार वैभव नाईक यांची ही शेवटची टर्म आहे. पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनच त्यांना धडा शिकवेल, असेही अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!